रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा भागात अपघातांची मालिका अजून ही सुरूच राहिली आहे. चार दिवसांनंतर पुन्हा सोमवारी सकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तसेच ग्रामस्थ आक्रमक झाल्याने त्यांनी महामार्ग रोखून धरला. महामार्गावरील हातखंबा गावाजवळ पुन्हा हा अपघात झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हा अपघात हातखंबा येथील शाळेजवळ झाला. गॅस वाहतूक करणा-या टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीला आणि काही दुचाकींना धडकला. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातानंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको केला. वारंवार होणाऱ्या टँकर अपघातांमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. अपघात झालेले टँकर ज्वलनशील पदार्थ घेऊन जात असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. मागील चार दिवसांपूर्वी याच भागात गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुमारे १५ तास महामार्ग ठप्प झाला होता. या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतुकीची सुरक्षा आणि या भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या महामार्गावरील वहातूक पुन्हा पाली साखरपा, देवधे व देवरूख मार्गे वळविण्यात आली आहे.
पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले आहे. यामुळे आता या महामार्गावरील वहातूक पूर्ववत सुरु करण्यात यश आले आहे.