बीड : घरकुल योजनेतील दुसऱ्या हप्तय़ांची रक्कम न मिळाल्याने उपोषणास बसलेल्या आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दोन गुंठे जागा आणि घरकुल देण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. या निर्णयानंतर मृत आप्पाराव पवार यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीय राजी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषणकर्त्यांचा मृत्यू झाल्याने मुर्दाड प्रशासनाचा व जिल्हाधिकाऱ्यांचा विविध स्तरावरुन निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलासाठी उपोषण करत असताना बळी गेलेल्या पवार यांच्या कुटुंबीयांनी जागा मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने सोमवारी सकाळपासून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने बैठका घेण्यात आले.  ४२ तासानंतर पवार यांच्या अंत्यविधीचा मार्ग मोकळा झाला.  सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना पवार कुटुंबीयांकडे पाठवले. मात्र, आता आश्वासन नको प्रत्यक्ष जागा आणि लेखी आदेश द्या अशी मागणी केली. पवार कुटुंबीय आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने  वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सायंकाळी उशिरा तहसीलदार सुहास हजारे, मृत आप्पाराव पवार यांच्या पत्नी कविता पवार, सामाजिक कार्यकर्त्यां मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, बबन वडमारे, अशोक हिंगे यांनी वासनवाडी (ता.बीड) शिवारात जागेची पाहणी केली.  स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून त्याठिकाणी दोन गुंठे जागा पवार कुटुंबाला देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharkul yojana apparao pawar on hunger strike death family beed ysh
First published on: 06-12-2022 at 00:02 IST