सातारा : कुसगाव विठ्ठलवाडी (ता. वाई) येथे गावठाण वस्तीत घुसून गोठ्यातील तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही एका कुत्र्याला आणि चार शेळ्यांनाही बिबट्याने ठार केले.
पाचगणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विठ्ठलवाडी (कुसगाव) डोंगराळ परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने लोकवस्तीत रात्री घुसून शेतकरी संपत गणपत गोळे यांच्या तीन शेळ्या ठार केल्या. यापूर्वीही बिबट्याने येथील शेळ्या व कुत्रे ठार केले आहेत. याबाबत वनविभागाला अर्ज दिला आहे. मात्र, वनविभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने गावामध्ये असंतोष आहे.
विठ्ठलवाडी हे गाव पाचगणीच्या पायथ्याशी आहे. आजूबाजूला दाट झाडीचा डोंगराळ भाग आहे. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने आतापर्यंत आठ ते दहा शेळ्या व कुत्रे डोंगरात व गावठाण वस्तीत घुसून ठार केल्या आहेत. याबाबत वनविभागाला माहिती देऊन लक्ष दिले जात नाही, अशी खंत भगवान सखाराम पाटणे व इतर ग्रामस्थांनी व्यक्त केली.