राज्यातील सर्वात मोठ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक राजकीय घडामोडींनंतर पुन्हा एकदा विश्वास पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे माजी अध्यक्ष स्पर्धेत होते. पहिली संधी कोणाला द्यायची? यावरून पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात गुरुवारी प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही एकमत झाले नव्हते. आज चर्चेचे आणखी एक आवर्तन झाले. बंद लिफाफ्यातून आलेल्या नावाचे बैठकीत वाचन झाले. त्यामध्ये मे २०२३ पर्यंत त्यांचा कालावधी असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर अध्यक्षपदाची माळ पाटील यांच्या गळ्यात पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारण विरहीत कारभार

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, “गोकुळच्या दमदार, गुणात्मक वाटचालीसाठी राजकारण बाजूला ठेवून विरोधकांसह सर्वांनाच कारभारात सामावून घेतले जईल. दूध उत्पादकांना प्रती लिटर दोन रुपयांची वाढ, वासाच्या दूधाचा प्रश्न, जादा परतावा यासह अन्य आश्वासनांची पूर्तता केली जाईल. निवडणुकीपूर्वी दूध उत्पादकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू”.

दोन महिन्यांत ‘गोकुळ’ची दूध दरवाढ – सतेज पाटील

सत्ता बदलाचा प्रत्यय

गेली तीस वर्ष गोकुळच्या अध्यक्ष निवडीनंतर मागील सत्ताधारी नेत्यांचा नामोल्लेख आवर्जून केला जात असे. गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणणारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आज विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी आवर्जून उल्लेख केला.

‘अमूल’च्या बरोबरीने  ‘गोकुळ’!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळला अमूलच्या बरोबरीत आणण्याचा विश्वास व्यक्त केला होता. “१४ लाख लिटर दररोजचे गोकुळचे दूध संकलन २० लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न करू. दुधाला लिटरला दोन रुपयांची दरवाढ, पारदर्शक कारभार, काटकसर, पशुखाद्यासह पशुवैद्यकीय व इतर दर्जेदार सेवांचा पुरवठा, वासाच्या दुधाची समस्या यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. गोकुळ दूध संघ देशात २७ व्या स्थानावर आहे. तो अमूलच्या बरोबरीने चांगला चालवून दाखवू”, असं त्यांनी नमूद केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gokul dudh utpadak sangh president vishwas patil once again by satej patil hasan mushrif pmw
First published on: 14-05-2021 at 19:12 IST