मुंबई : भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची साथ हवी असून त्याला अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना अपेक्षा आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून मनसे महायुतीबरोबर येण्याचे संकेत दिले आहेत.मनसेने महायुतीत सामील होण्याची भाजपची अपेक्षा असली, तरी लोकसभेसाठी एखादी जागा सोडली जाण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
ठाकरे यांनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली आहे.मनसेने भाजपकडे तीन जागांची मागणी केली आणि किमान एखादी तरी जागा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र भाजपच्या कोटय़ातील उत्तर मध्य मतदारसंघ वगळता मनसेला देता येतील, अशा जागा शिल्लक नाहीत. दक्षिण आणि वायव्य मुंबई या शिवसेना शिंदे गटाच्या जागाही भाजपला हव्या आहेत. शिंदे हे वायव्य मुंबई मतदारसंघ सोडण्यास अनुकूल नसून या मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावरच महायुतीचा उमेदवार लढविण्याची त्यांची भूमिका आहे.