जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दरात काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी देखील मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याने ऐतिहासिक झेप घेतली. दुसरीकडे चांदीच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींनी जोरदार उसळी घेतली असून, एमसीएक्सवर सोन्याचा भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अपेक्षेपेक्षा कमकुवत बिगर-शेती वेतन आकडेवारीनंतर, फेडरल रिझर्व्हकडून पुढील धोरण बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता आहे. व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि जागतिक स्तरावरील टॅरिफ संदर्भातील अनिश्चितता यामुळे सोन्यासारख्या मौल्यवान धातूंना ठोस आधार मिळत आहे. या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन उत्पादक किंमत निर्देशांक आणि मुख्य ग्राहक किंमत निर्देशांक अहवालांवरही केंद्रीत राहणार आहे. या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवरून बुलियन किमतींची दिशा आणि त्यातील चढ-उतार निश्चित होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, सोने ३,६५० डॉलर प्रति औंस आणि चांदी ४१.२९ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय सोने बाजारपेठेवर झाला आहे. डॉलर निर्देशांकात घसरण झाली आहे आणि डॉलरच्या तुलनेत रूपया ८८.३७ वर व्यवहार करत आहे. कमकुवत डॉलरमुळे गुंतवणूकदारांना सोने आणि चांदी अधिक आकर्षित करत आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, त्यामुळेही मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढत आहे. भारतात लग्न आणि सणांचा हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने पुढील काळात सोने आणि चांदीची मागणी वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जळगावमध्ये एक सप्टेंबरला २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख आठ हजार ४५९ रूपयांपर्यंत होते. नंतरच्या काळात कमी-अधिक प्रमाणात सातत्याने दर वाढत राहिल्याने मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार १९७ रूपये झाले. 

सोमवारी देखील २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ११ हजार ७५५ रूपयांपर्यंत होते. सोने दरात एक ते नऊ सप्टेंबरच्या कालावधीत तब्बल ४७३८ रूपयांनी वाढ झाल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

चांदीत १०३० रूपयांची वाढ

जळगावात गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नव्हती. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २९ हजार ७८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.