ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला माझ्यावर हल्ल्याची सुपारी दिली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. या प्रकरणी राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे. यावरच आता संजय राऊतांनी नाव घेतलेल्या राजा ठाकूरने प्रतिक्रिया दिली आहे. मी राऊतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे राजा ठाकूर म्हटला आहे.

हेही वाचा >>> सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ टीकेला नवनीत राणांचे जशास तसे उत्तर; म्हणाल्या “मी त्यांना…”

मला गुंड म्हणण्याचा राऊतांना कोणी अधिकार दिला?

“संजय राऊत यांनी केलेला आरोप खोटा आहे. संजय राऊतांना हे आरोप स्वप्नात दिसले होते का? संजय राऊत कोणाबद्दल काहीही बोलत आहेत. संजय राऊत मला गुंड बोलत आहेत. त्यांनी मला गुंड म्हणण्याचा कोणी अधिकार दिला. डॉ. श्रीकांत शिंदे हे रिकामे बसले आहेत का. कोणताही मुद्दा नाही म्हणून काहीही बोलायचे का? बदनामी केल्यामुळे मी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे,” असे राजा ठाकूर म्हणाला आहे.

हेही वाचा >>>“श्रीकांत शिंदेंकडून हल्ल्याची सुपारी,” संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, “२ हजार कोटी…”

संजय राऊतांनी काय आरोप केला आहे?

संजय राऊतांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून माझ्यावर हल्ला करण्याचा कट आहे, असा दावा केला आहे. “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा हटवण्यात आली. लोकप्रतिनिधींना सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. पण एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे,” असे राऊतांनी पत्रात नमूद केले आहे.

राजा ठाकूर नेमका कोण आहे?

जानेवारी २०११ मध्ये ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा येथील विटावा पुलाखाली दीपक पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी रविचंद ठाकूर उर्फ राजा ठाकूर होता. या प्रकरणी राजा ठाकूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुढे एप्रिल २०१९ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय अशी ओळख निर्माण केली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजा ठाकूर पुन्हा पोलिसांसमोर हजर न होता, तो फरार झाला. यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने येऊरच्या साई ढाबा येथे सापळा रचून राजा ठाकूरला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुन्हा जामिनावर सुटलेल्या ठाकूर याने एकनाथ गटाचा राजाश्रय मिळवला. या काळात राजा ठाकूरने खासदार श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय अशी ओळख निर्माण केली आणि ठाण्यात पुन्हा दहशत निर्माण केली. त्याचबरोबर दोन आठवड्यांपूर्वी ठाण्यात शिंदे पितापुत्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकूर याने भव्य कबड्डी सामान्यांचे आयोजन करत शहरभर शिंदे यांना शुभेच्छा देणारे बॅनरही लावले होते.