Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Clash Viral Video : विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आमदार व विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत असतात, आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असं साधारण चित्र आजवर आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र आता विधिमंडळात आमदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली असून हे कार्यकर्ते विधान भवन परिसरात हाणामाऱ्या करू लागले आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक खटके उडत असतानाच पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (१७ जुलै) आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ फ्रीस्टाइल हाणामारी झाली.
या हाणामारीबाबत आमदार पडळकर म्हणाले, “काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. त्यांना सक्त ताकीद देऊन कारवाई करा, अशी विनंती देखील मी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. विधानसभेच्या आवारात जे काही घडतं, त्यावर अध्यक्ष कारवाई करतील. कारण तो अध्यक्षांच्या अधिकारातला विषय आहे. त्यामुळे यावर मी फार काही बोलणार नाही. काल घडलेल्या प्रकरणानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हाच सर्वश्रेष्ठ असतो, त्याप्रमाणे कारवाई होईल.”
कालच्या घटनेवर आमचं काहीच मत नाही : पडळकर
गोपीचंद पडळकर म्हणाले, “विधानसभेच्या आवारात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापती सर्वोच्च असतात. त्यांची भूमिका महत्त्वाची असते. काल घडलेल्या प्रकारावर आमचं काहीच मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. जी काही कारवाई आमच्या कार्यकर्त्यांवर होईल, त्याला आम्ही न्यायालयात सामोरे जाऊ.”
पडळकरांनीच कार्यकर्त्याला इशारा केला?
दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप होत आहे की त्यांनीच कार्यकर्त्याला इशारा केला आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. टकले याच्यासह इतर चार जणांनी मिळून नितीन देशमुख याला मारहाण केली. गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्याला इशारा करत असल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. यावरही गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधकांच्या आरोपांवर पडळकर काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर म्हणाले, “तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा नाही. विधीमंडळ परिसरात तेव्हा खूप गर्दी होती. तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीने मी एका कोपऱ्यात उभा होतो. तुम्ही सर्व व्हिडिओ पहा. मी १०-१५ मिनिटे उभा होतो. कार्यकर्त्यांबरोबर फोटो काढत होतो. काल सभागृहात माझी लक्षवेधी होती. माझ्या लक्षवेधीवर चर्चा होणार होती. मी त्याची वाट पाहत होतो. मी दिवसभर सभागृहातच होतो. विधीमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर १० वी लक्षवेधी माझीच होती. अर्ध्या तासाची चर्चा होणं अपेक्षित होतं. आमचे मंत्री आले नव्हते. त्यामुळे लक्षवेधी होणार नाही असं मला सांगण्यात आलं. म्हणून मी तिथून निघालो.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
भाजपा आमदार म्हणाले, “मी सभागृहातून बाहेर पडल्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. परंतु, ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यासाठी मी विधानसभा अध्यक्षांचा आदर करतो. परंतु आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू.”