आयुष्यात आपण कधीच बनावट मतदान करवून घेतले नाही. सध्या राष्ट्रवादीत असलेली ‘अर्धी गँग’ जिल्हा बँक प्रकरणात फरारी आहे. पूर्वी हेच माझ्याबरोबर होते, भविष्यात ते पवारांबरोबर राहतील, याची शाश्वती नाही. फरारी आमदार आमदार अमरसिंह पंडित यांच्या तालुक्यात येऊन पवार सभा घेतात. बँकेतील मारामारी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सुरेश धस यांना उमेदवारी दिली. अशा फरारी व बनावट गँगपासून पवारांनीच सावध राहणे गरजेचे आहे, असा सल्ला भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना दिला.
येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार बठकीत मुंडे बोलत होते. या वेळी मुंडेंनी आजच गेवराईत झालेल्या पवार यांच्या प्रचारसभेचा संदर्भ देत राष्ट्रवादी व जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. आजच्या सभेतून पवारांसमोर जिल्हय़ातील वक्त्यांनी शिवराळ भाषा वापरली, यावरून त्यांच्यावरील संस्कार पुसले गेले आहेत. पवारांनी अशा लोकांना आवरावे, असा सल्ला मुंडे यांनी दिला. पाहणी दौऱ्यावर असताना पवारांनी प्रचार आटोपला. अनेक ठिकाणी गुप्त बठका घेतल्या. अनेकांच्या घरी जाऊन त्यांचे दु:ख जाणून घेतले. मुक्कामही केला, तेव्हा पवारांना अशा प्रकारे ढोंगबाजी करण्याची काय गरज, असा सवाल करून या वयात पवारांनी धकाधकी करून न घेता बीडमध्येच महिनाभर राहावे, असे जाहीर आमंत्रणही दिले!
पवारांनी महिनाभर बीडमध्ये मुक्काम ठोकला, तरीही जास्त मतांनी निवडून येऊ, असा आत्मविश्वास मुंडेंनी व्यक्त केला. पवारांनी माझ्या कर्जमाफीची खिल्ली उडवली. या संदर्भात मुंडे म्हणाले की, २००० पूर्वी ६९ हजार कोटींचे कर्ज रिझव्र्ह बँकेने नव्हे, तर केंद्र सरकारने भरले. कर्जमाफीची घोषणा केंद्रानेच केली होती. केंद्रानेच आपल्या तिजोरीतून ६९ हजार कोटींचे कर्ज भरले होते. आता हेच पवार कर्जमाफीचे अधिकार केंद्राला नसून रिझव्र्ह बँकेला आहेत, असे सांगत जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
मुंडे यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याची टीका पवारांनी गेवराई येथे केली. याचा संदर्भ देत मुंडे म्हणाले की, पवारांना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण स्वतच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. जिल्हा बँक प्रकरणात राष्ट्रवादीतील अर्धा जिल्हा फरारी आहे, असे असताना फरारी असलेल्या आमदाराच्या तालुक्यातच पवार येऊन सभा घेत आहेत. तेव्हा आपल्याभोवती काय आहे, हे पवारांनी आधी तपासावे. बँकेत जाऊन मारामारी करणाऱ्या धस यांना उमेदवारी का दिली, असा सवालही मुंडेंनी केला. पवार यांनी उमेदवारी देताना उमेदवाराचे रेकॉर्ड पाहिले नाही, केंद्रेकरांनाही त्यांनीच हाकलले, असा आरोप मुंडे यांनी केला.
‘नवाबांनी कधी शेत पाहिले का?’
गारपिटीच्या प्रश्नावरून गोपीनाथ मुंडे राजकारण करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी केला. याचा संदर्भ देत ‘नवाबांनी कधी शेत पाहिले आहे का? भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात की वर हे देखील त्यांना माहीत नसावे. जावे त्यांच्या वंशा या प्रमाणे ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खस्ता खाल्या, जे स्वत शेतकरी आहेत त्यांनाच शेतकऱ्यांचे दुख कळेल,’ असा टोला मुंडे यांनी लगावला.