भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने पत्नी, मुलगी, जावई यांच्यासमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे राज्यभरातील दिग्गज नेते उपस्थित होते.
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मुंडे यांनी अर्ज दाखल केला. पत्नी प्रज्ञा मुंडे, मुलगी आमदार पंकजा पालवे, जावई, इतर नातेवाईक यांच्यासह रिपाइं अध्यक्ष आठवले, प्रदेशाध्यक्ष फडणवीस, तावडे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, रासपचे महादेव जानकर आदी या वेळी उपस्थित होते. यानंतर मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजीमहाराज, सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळय़ांना अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठय़ा संख्येने कार्यकत्रे उपस्थित होते.
पवार यांचे विधान गंभीर- तावडे
मुंडे यांचा अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शाई पुसून दोन वेळा मतदान करण्याबाबत जाहीर वक्तव्य केले. मात्र, लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाला एकच वेळेस मतदानाचा अधिकार असताना अशा पद्धतीने वक्तव्य करणे ही गंभीर बाब आहे, असे सांगितले. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. बीडमधून मुंडे यांचा विजय राष्ट्रवादी थांबवू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी गारपिटीचे अस्मानी संकट आल्यामुळे मुंडे यांनी साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला. मोठय़ा मताधिक्याने मुंडे यांचा विजय होणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला. जानकर यांनी मुंडे यांनी रासपला महायुतीत घेऊन सन्मान केला. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे जाहीर सभेतून आपण त्यांना दूरध्वनी करून मुंडेंनी मला फसवल्याचे धादांत खोटे बोलत असल्याचे म्हटले. आपण कधीही धनंजय मुंडे यांना फोन केला नाही. त्यांनी दोन दिवसांत माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करू, असा इशारा जानकर यांनी दिला.