लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये वेगवेगळे बोलणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्याची गरज असल्याची घणाघाती टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी तासगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत केली. भाजपा हा विश्वासघातकी पक्ष म्हणून शिवसेनेला छुप्या पद्धतीने कमकुवत करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी तासगाव येथील कोहिनूर मंगल कार्यालयात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बठकीस उमेदवार पाटील यांच्यासह  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती शैलजा पाटील यांच्यासह डी. के. पाटील, अनिवाश पाटील, अक्षय पाटील, आरवडेचे युवराज पाटील, वायफळेचे सुखदेव पाटील आदींसह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना गृहमंत्री पाटील म्हणाले की, मला सांगलीतून हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना बीडची जनताच हद्दपार करेल. मी प्रचारासाठी बीडमध्ये गेलो तर गोपीनाथ मुंडेच बीड जिल्ह्याच्या बाहेर पडू शकणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. मुंडे यांनी अन्य पक्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्ष प्रवेश देऊन आश्रय देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या प्रचार सभांमध्ये मुंडे यांची वक्तव्ये वेगवेगळी असल्याचे निदर्शनास आणीत गृहमंत्री पाटील म्हणाले की, औरंगाबादमध्ये राज्याचा मुख्यमंत्री मी होणार असल्याचे सांगणारे मुंडे पुण्याच्या सभेत कृषिमंत्री होणार असल्याच्या वल्गना करतात. तर काही ठिकाणी भावी गृहमंत्री मीच असल्याचे सांगत आहेत. त्यांना बहुतेक दिवास्वप्ने पाहण्याची सवय सत्तेपासून दूर गेल्याने निर्माण झाली असावी. त्यांनी आता मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
राज्यातील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा डाव भाजपाने आखला असून याचीच प्रचिती या निवडणुकीच्या संग्रामातून पुढे येत आहे. अशा विश्वासघातकी मित्रापासून शिवसेनेनेही बोध घ्यावा असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, लोकसभेचे उमेदवार प्रतीक पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.