सांगली : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील आत्महत्या केलेले हर्षल पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेकडील जलजीवन मिशनअंतर्गत कोणत्याही कामाचा करारनामा केलेला नाही, त्यामुळे त्यांचे देयक प्रलंबित असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा खुलासा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी गुरुवारी एका प्रसिध्दिपत्रकाद्वारे केला. दरम्यान, पाटील याच्या आत्महत्येस राज्य शासन जबाबदार असून नाकर्तेपणामुळे तरुणाचा बळी गेला आहे, असा आरोप करत शासनाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

मृत पाटील ही व्यक्ती कंत्राटदार म्हणून नोंदीत असल्याचे दिसून येत नसल्याचे कार्यकारी अभियंता येवले यांनी प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे. जिल्ह्यात ६५९ नळपाणी योजना, १७२१ शाळा व अंगणवाडी यांना पाणी पुरवठा करणे, ३३६ नळ जोडणीची कामे व ४४ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अशी २ हजार ७६२ कामे असून यापैकी २११९ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. करारनामा केलेल्या कंत्राटदारांची संख्या ३४१ आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ९५४ कोटी ५३ लाख रुपयांची कामे असून देयकाची रक्कम ४८१ कोटी ८१ लाख आहे. यापैकी ४६२ कोटी ७२ लाख रुपये अदा केले असून जिल्हा स्तरावर १९ कोटी ९ लाख व उपविभागीय स्तरावर २० कोटींची देयके तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे येवले यांनी प्रसिध्दिपत्रकात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शासनाकडे देयके प्रलंबित राहिल्याने आर्थिक अडचणीतून कंत्राटदार पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी तांदूळवाडी येथे घडली असून या घटनेस राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करत शासनाच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी निषेध आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, शंभूराज काटकर, संजय काटे, महिला आघाडी प्रमुख सुजाता इंगळे, वैशाली ठाणेदार, विराज बुटाले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.