कराड : पाटण तालुक्यात भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना लवकरात लवकर चांगले, सुसज्ज, सुरक्षित निवासस्थान मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याबाबत बांधकाम विभाग आणि ठेकेदार संस्थेला (एजन्सी) तशा सूचनाही दिल्या आहेत. ज्यांना आता निवारा नाही, अशांना प्राधान्याने येत्या काही महिन्यांत ही घरे उपलब्ध करून दिली जातील. सर्वेक्षण करून या घरांची उभारणी केली जात आहे. जरी काही ठिकाणी जागेच्या अडचणी असल्या, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीची उभारणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्यातील तारळे येथे पत्रकारांशी ते बोलत होते. प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांची उपस्थिती होती.  

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘पर्यटनस्थळांबाबत आमचा दृष्टिकोन पर्यटनाला चालना मिळावी हा असून, लोकांचा कल फक्त हंगामी न राहता बारा महिने पर्यटन सुरू राहावे यासाठी आणखी काय नवीन करता येऊ शकते का, हे पाहिले पाहिजे. पाटण तालुक्यातील दुर्गम अशा मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांच्या पुनर्वसनाबाबत स्वतः शासन प्रयत्न करत आहे.

या गावांतील लोकांची इच्छा आहे, की पुनर्वसन लवकरात लवकर करावे. महसूल विभागाने जे जे करता येईल ते सर्व पार पाडले आहे. राहता राहिला प्रश्न त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा, तर ते आता मार्गी लागले आहे. काही महिन्यांत इतकी वर्षे रखडलेले पुनर्वसन आता होऊन जाईल.’

पर्यटनस्थळांवर प्रवेश शुल्काबाबत वन विभागाशी बोलून सर्वसामान्यांना परवडणारे शुल्क घेण्यात यावे यासाठी सूचना केल्या जातील, असे पाटील यांनी सांगितले. कोयना नदीवरील पाण्याखाली जाणारे संगमनगर (धक्का) व मणेरी येथील या पुलांचे काम झाले आहे. मात्र, कोयना नदीवरील नेरळे पूल हा अनेक वर्षांपूर्वीचा असून, सध्या तो धोकादायक अवस्थेत आहे.

कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर हा पूल पाण्याखाली जाऊन मोरणा विभागाचा पाटणशी संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी नवीन पुलाची सातत्याने मागणी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनीही येथे पूल होणे गरजेचे असल्याचे सांगून संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवालानंतर निर्णय घेऊ, असे सांगितले. यावर गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण झाले नसल्याचे सांगण्यात आले, तर या पुलाच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपये खर्च झाले असून, त्यापेक्षा संरचनात्मक लेखापरीक्षणासाठी निधी मिळाल्यास या पुलाची नेमकी स्थिती लक्षात येईल, असे सुचविण्यात आले.