काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक पुन्हा पुढे ढकलली

हिंगोली : जिल्ह्यात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचा दारुण पराभव झाल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांत मरगळ आली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जाहीर झाली. उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली, तरी विधानसभा निवडणूक निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीची हिंगोलीत नियोजित संयुक्त बैठक २१ सप्टेंबर रोजी होती, त्यानंतर २४ सप्टेंबर ही पुढची तारीख ठरवली, पण आज ती बैठक झाली नाही. आता बैठकीचा पुढचा मुहूर्त शुक्रवारी असण्याचे सांगण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात माजी खासदार राजीव सातव व माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात दोन  गट आहेत, सातव यांनी गोरेगावकरांची राजकीय शक्ती कमकुवत करण्यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात ओढून सर्वाना पक्षाची जिल्हास्तरीय पदे बहाल केली. आगामी निवडणुकीत गोरेगावकर यांना उमेदवारी मिळू द्यायची नाही असा चंग बांधला, असे माजी खासदार सातव यांचे समर्थक खुलेआम सांगत होते. सातव यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या काही समर्थकांची नावेसुद्धा पुढे केली होती.

काँग्रेसकडून माजी आमदार भाऊ गोरेगावकर व सातव समर्थक राजेश भोसले, विनायक देशमुख, सुरेशअप्पा सराफ, डॉ. रवी पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. जिल्ह्यात कळमनुरी, हिंगोली काँग्रेसला तर वसमत विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीला सुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कळमनुरीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे कामाला लागले. वसमतमध्ये राष्ट्रवादीकडून जयप्रकाश दांडेगावकर की राजू नवघरे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर हिंगोली विधानसभा मतदार संघात गेल्या वेळी गोरेगावकर दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र सातव, गोरेगावकर यांच्या गटबाजीतून काँग्रेसचा उमेदवार निश्चित कोण, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र गटबाजीमुळे सारे घोडे अडले आहे.