गारपीटग्रस्त शेतक-यांनी शुक्रवारी अत्यंत व्यथित शब्दांत या अस्मानी-सुलतानी संकटाचे गा-हाणे मांडले. जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्यासमोर ते मांडताना अनेकांना रडू कोसळले. त्याने पिचडही हेलावले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे निवडणूक आयोगाशी बोलून सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपूर्वी तुफानी गारपीट झाली. त्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिचड यांनी शुक्रवारी या आपत्तीची पाहणी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सभापती मच्छिंद्र केकाण, संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे आदी त्यांच्या समवेत होते.
या वेळी शेतक-यांनी भावनाविवश होऊन व्यथा मांडल्या. पिचड यांनी येथूनच जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी संपर्क साधून जातीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करू न घ्या, यात कुठलेही राजकारण आणू नका, सर्वाना न्याय मिळेल याची खबरदारी मी स्वत: घेईल असे सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मांडून शेतक-यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन पिचड यांनी दिले. जिल्हय़ात अनेक ठिकाणी गारपीट झाली, मात्र कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील नुकसान प्रचंड आहे हे त्यांनी मान्य केले.