पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या प्रमुख यात्रांसह एकादशी दिवशी लाखो भाविक, तसेच दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पूर्ण केल्याचे समाधान मिळत नसते. त्यामुळे वारकरी संप्रदायात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाएवढेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला महत्त्व असल्याने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

कार्तिक यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, पंढरपूर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘मंदिर समिती व नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर येथील वारी कालावधीतच स्वच्छता न करता दररोज स्वच्छता करावी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे. तसेच वाळवंटात जादा तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध ठेवा. त्याचबरोबर वाळवंटात कायमस्वरूपी पर्यावरणपूरक शौचालय स्थापन करण्याबाबतचे नियोजन करावे. उघड्यावर शौचालयास बसू नये, यासाठी जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात. दर्शनरांगेतील भाविकांना तत्काळ व सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन, तसेच दर्शनरांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षारक्षकांचा नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, सुरक्षारक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमावेत.’

चंद्रभागा नदीस्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुस्थितीत बोटी, तसेच प्रशिक्षक कर्मचारी सज्ज ठेवावेत. महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत, चंद्रभागा एसटी स्टँडवर स्वच्छता व सुलभ शौचालयाची व्यवस्था करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारी कालावधीत अवैध दारूविक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन करावे. आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा द्याव्यात. आषाढी यात्रा कालावधीत सर्व विभागाने उत्तम नियोजन केल्याने आषाढी वारीत भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. त्याच पद्धतीने कार्तिक वारीतही नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी या वेळी दिल्या.