रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून जाणा-या सागरी महामार्गाच्या कामाबाबत राज्य शासन प्रयत्नशील असताना आता रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील ग्रामस्थ व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत काळबादेवी येथे पूल बांधण्याबाबत ठाम असल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. काळबादेवी येथे हा पूल न बांधता सरळ रस्ता बांधण्यात यावा असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
राज्य शासनाकडून सागरी महामार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरी जवळच असलेल्या काळबादेवी गावातून जाणा-या या महामार्गासाठी भूमि अभिलेख कार्यालयाकडून जमीन संपादनाची प्रक्रिया नुकतीच पुर्ण करण्यात आली. यावेळी येथील ग्रामस्थांनी होणा-या उड्डाण पुला बाबत आक्षेप घेत या पुलाला विरोध दर्शविला आहे. याविषयावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, काळबादेवी येथील पुलामुळे रत्नागिरी तालुक्याचा विकास होणारच आहे. तसेच पर्यटनाला ही चालना मिळणार आहे. याबाबत आपण रवींद्र चव्हाण यांच्याशी बोललो असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जेवढे काळबादेवी येथील लोकांनी पूल नको म्हणून अर्जावर सह्या केलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त सह्या हा पूल हवा म्हणून केलेल्या आहेत. या संदर्भात मी स्वतः गावातील लोकांबरोबर तीन वेळा बैठका घेतलेल्या आहेत. तसेच चौथी बैठक ही संबंधित कंपनी अधिकाऱ्यांच्या समवेत मी शासकीय विश्रामगृहात घेतलेली होती. त्यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी या पुलाला आपला कोणताच विरोध नसल्याचे सांगून काळबादेवी येथे नकाशात दाखवल्या प्रमाणे पूल व्हावा अशी संमती असल्याचे सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, काळबादेवीचा पूल होणार आहे. रत्नागिरीच्या विकासासाठी व पर्यटनासाठी ऐतिहासिक पूल होत आहे. त्यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च करून हा सागरी महामार्ग होत आहे. आपण गावातील एकही घर न जाता शेतीची जमीन न घेता सरळ मिऱ्यापर्यंत पर्यटन आणि कोस्टल हायवेच्या दृष्टीने एक चांगला पूल तयार होणार आहे. त्याचे आपण सगळ्यांनी स्वागत केले पाहिजे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.