कराड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच जोरदार पावसात पाटणजवळ पाण्याखाली गेलेला गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला होण्याच्या मार्गावर आहे. या महामार्गासह जिथेही रस्ते, साकव पूल, फरशी पूल पाण्याखाली गेलेत अथवा अन्य कारणाने बंद आहेत, ते खुले करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ठेकेदार कंपनीकडून अनेक ठिकाणी झालेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, मनमानीचा सध्या वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. हा गोंधळ उडाल्याने, तसेच जोरदार पावसाने खचलेला रस्ता वाजेगाव- मारुल (ता. पाटण) येथे बंद करण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहतूक येथे ठप्प झाल्याने एकाच गोंधळ उडाला. प्रशासनाची धांदल उडताना, वाहनधारकांची पुरती दैना उडाली. विभागातील धोकादायक बनलेला छोटे साकव, फारशी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ते पुन्हा सुरू होत आहेत. दरम्यान, खोळंबणारी छोट्या वाहनांची वाहतूक पर्यायी नेरळे, मेंढेघर या रस्त्यावरून सुरू आहे. तर, चिपळूणकडून आलेली व येणारी मोठी व जड वाहने मागे फिरवून घेण्यात आली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच रस्त्यांच्या कामाच्या त्रासातून जनप्रक्षोभ उफाळून येऊन, वारंवार सूचना, तक्रारी होऊनदेखील त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन अथवा संबंधित ठेकेदार कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात बंद झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे वाहनधारक, प्रवासी व लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने खोळंबलेले सर्व रस्ते पूर्ववत करण्यासाठी प्रशासन कृतिशील असल्याचे दिसत आहे.