शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता थुंकल्याची घटना घडली होती. भर पत्रकार परिषदेत वाहिन्यांच्या कॅमेरासमोर राऊत यांनी ही कृती केली आहे. संजय राऊतांवर या कृतीवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. नेमकं काय घडलं? खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली होती. "उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर शुक्रवारी राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकण्याची कृती केली. हेही वाचा : संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण…” "आम्ही इतके नालायक आहोत, की…" याबद्दल गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. "संजय राऊतांची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे, यावरून दिसते. ४१ खासदारांनी संजय राऊतांना मतदान केलं, त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यांच्या मुलाबाबत हे थुंकत आहे. आम्ही इतके नालायक आहोत, की तुम्ही आमच्यावर थुंकत आहे. तर, आमची खासदारकी माघारी द्या. नालायक लोकांच्या मतांवर खासदार कशाला राहता," असं आव्हान गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलं आहे. हेही वाचा : “महाविकास आघाडीत बापात बाप नाही, अन्…” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले… "महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचं काम" संजय राऊतांच्या कृतीवर श्रीकांत शिंदे यांनीही भाष्य केलं आहे. "महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. जिथे विरोधक देखील एकमेकांचे नाव आदराने घेत असतात. आज त्या सगळ्या पातळ्या सोडून दिल्या जात आहेत. विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचं काम सुरु करतात, ते रात्रीपर्यंत सुरु असतं. महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचं काम सुरु आहेत," असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांना दिलं आहे.