मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला होता. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. दरम्यान, यासंदर्भात शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही शिवसैनिक असून आम्हाला पैसे देऊन माणसं बोलावण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसेच राज्यातली जनता मुख्यमंत्र्यावर खूश असल्यानेच काल नागरिकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली होती, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटपाचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

“मी जळगावमध्ये सभा घेतली, तेव्हा माझ्यावरही असाच प्रकारचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आमची ही पद्धत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं बोलवण्याची गरज पडत नाही. आमच्या सभेला होणारी गर्दी पाहून विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीही नाही, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप लावण्यात येत आहेत” , अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, “विरोधकांकडून खोटो आरोप होत आहे. आज मुख्यमंत्री ज्या प्रकारे धडाकेबाज निर्णय घेत आहेत, त्यामुळे राज्यातली जनता त्यांच्यावर आणि सरकारवर खूश आहे. त्यामुळेच काल नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी केली होती”

हेही वाचा – दसरा मेळाव्याच्या राजकारणावरून धनंजय मुंडेंचा शिंदे सरकारला टोला; म्हणाले, “हे सरकार…!”

राज्यात पालकमंत्री निवडीवरून होत असलेल्या आरोपालाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. “राज्यात पालकमंत्री बनवण्यात निश्चितपणे उशील झाला आहे. मात्र, जनतेची कोणतीही कामे थांबलेली नाही. शेतकऱ्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मागच्या सरकारच्या काळात जनतेची कोणतीही कामे झाली नाही, म्हणून विरोधकांकडून उलटसूलट गोष्टी सुरू आहे”, असेही ते म्हणाले.