जिल्ह्य़ात गारपिटीमुळे शेतातील पिकांचे कोटय़वधीचे नुकसान झाले. हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत गुरुवारी करण्यात आली. मागील वर्षांच्या तुलनेत पाचपट अधिक नुकसान गारपिटीने झाले. त्यामुळे पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी पुनर्वसनमंत्र्यांकडे केली आहे. जि. प. स्थायी समिती बैठकीतील मागणी सरकापर्यंत कळवू. मात्र, तसा ठराव घेता येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.
दरम्यान, किती नुकसान झाले याचे पंचनामे सुरू झाले आहे. तथापि, अजूनही माहिती संकलित झाली नाही.
दुष्काळानंतर चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात पिके घेतली होती. ठिबकसह बियाणांवरही मोठा खर्च केला. मात्र, गारपिटीमुळे मागील वर्षीपेक्षा पाच पट अधिक नुकसान झाल्याचा दावा आमदार बंब यांनी केला. शेतीतील काही कामे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात बुधवारी रात्रीही काही ठिकाणी पुन्हा गारपीट झाली. वेगवेगळ्या ठिकाणी गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीपेक्षाही हिंगोलीत गारपिटीचा फटका अधिक
वार्ताहर, हिंगोली
जिल्ह्य़ात गारपिटीने सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. पैकी सव्वातीन हजार हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. गारपिटीच्या पावसात अंगावर वीज पडून सेनगाव तालुक्यातील भगवती व हिंगोली तालुक्यातील कडती येथे दोन शेतक ऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच ६ जनावरे दगावली.
जिल्ह्य़ात २३ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले. फळबागांनाही मोठा फटका बसला. पावसाळ्यात अतिवृष्टीने ५ हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले होते. कापसावर लाल्याचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक ऱ्यांनी कापूस मोडून गहू, हरभरा यासारख्या पिकांची पेरणी केली. मात्र, पिकांचा घास तोंडाशी असताना गारपिटीने तडाखा दिला. जिल्ह्य़ात ६ हजार ७१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. हिंगोली तालुक्यात १ हजार ४१९ हेक्टर, कळमनुरी १ हजार १९४, सेनगाव १ हजार ७७, वसमत १ हजार ६१७ व औंढा नागनाथ १ हजार ४०३ हेक्टर या प्रमाणे नुकसान झाले. यातील सुमारे ३ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रात ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले.