मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील शेतीलाही पावसाचा फटका
पुणे / नागपूर : अवघ्या तीन दिवसांपूर्वी थंडीची लाट अनुभवणाऱ्या विदर्भाला गुरुवारी वादळी वारे आणि मुसळधार पावसासह झालेल्या गारपिटीने झोडपले. त्यामुळे शेतपिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.
मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस झाला असून, सोलापुरात पावसाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडय़ात परभणी, लातूर, हिंगोलीतही पावसाने हजेरी लावली. नगरमध्ये दाट धुके पडले असून, द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले. उत्तरेकडील राज्यांतून सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने राज्यात दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. मात्र, वातावरणात होणारे बदल आणि मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंडीत अडथळा निर्माण होऊन राज्याच्या काही भागात ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. विदर्भात तीन दिवसांपूर्वी थंडीची लाट होती. बुधवारी विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. गुरुवारी अनेक भागांत गारपीट आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नागपूरमध्ये ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
उपराजधानीसह विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांत गुरुवारी झालेली गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पूर्व विदर्भात ३१ डिसेंबरपासूनच पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारीला दिवसभर पाऊस सुरू होता. मध्यरात्रीनंतर मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नागपूर शहरासह ग्रामीण भागाला गारपीट आणि मुसळधार पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यातही गारपीट झाल्याने संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. शहरात गारपीट आणि पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, तिवसा, चांदूर रेल्वे या तालुक्यांना गारपिटीचा फटका बसला. खरिपातील तूर, कापूस आणि रब्बीतील गहू, हरभरा, कांदा या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे शेतातील उभी पिके सपाट झाली. काढणीला आलेली तूर आणि कापसाला याचा सर्वाधिक फटका बसला.
पन्नास टक्के संत्रा बागांना फटका?
विदर्भातील अवकाळी पावसामुळे सुमारे ५० टक्केसंत्रा बागांवर परिणाम होण्याची शक्यता संत्रा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, आर्वी भागात गारा पडल्या. आर्वी तालुक्यातील गारपिटीमुळे सुमारे ५० हेक्टर शेतीला त्याचा फटका बसला. नानपूर शिवारातील बाळा जगताप यांच्या केळीबागेतील ४० हजारपैकी २० हजार केळींची झाडे गारपिटीने कोसळली. यवतमाळ जिल्ह्यातील पूसद, उमरखेड परिसरातही थोडी गारपीट झाली. उर्वरित ठिकाणी साधारण पाऊस पडला. चंद्रपूर, गडचिरोलीसह अकोला, वाशीम, बुलढाणा आदी जिल्ह्यांत मात्र हलका पाऊस झाला. विदर्भात पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सोलापुरात अवकाळीने पिकांचे नुकसान
सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ाच्या काही भागात गुरुवारी थंडीचे वातावरण असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात पहाटे हलक्या व मध्यम सरी कोसळल्या. तर जिल्ह्य़ात दक्षिण सोलापूर व अक्कलकोट भागातही अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतात काढणीला आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण आहे. नववर्षांला तर दुपापर्यंत सूर्यदर्शनच झाले नव्हते. ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी दुसऱ्या दिवशी पहाटे अपेक्षेप्रमाणे शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, दुपारनंतर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यात दुधनी, मैंदर्गी भागात, तर दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप, बसवनगर, तेरा मैल आदी भागात सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या तूर व अन्य काही पिके काढणीला आली आहेत. पावसामुळे भिजलेली ही पिके दोन दिवस वाळवावी लागणार आहेत. तर, द्राक्ष बागांमध्येही किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एखादी औषध फवारणी घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले.