दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर कवठे महांकाळ तालुक्यातील अलकूड, हरोली, खरशिंग या दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात अर्धा तास गारपीट झाली. भरुन आलेल्या आभाळाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या.

गेल्या दोन दिवसापासून हवेतील तपमान ३९ अंशावर पोहचले आहे. असह्य उकाड्यांने शेतीची कामेही दुपारनंतर ठप्प होत आहेत. आज दुपारनंतर पुर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह ढगांची गर्दी आकाशात झाली. सायंकाळी गारांचा जोरदार मारा करीत दंडोबा डोंगराच्या पूर्व बाजूसह भोसे भागात पाऊस झाला. पावसामुळे रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने झाली. दुचाकी चालक गारांचा मारा चुकवण्यासाठी उड्डाण पूलाखाली आसऱ्यासाठी थांबले होते.