राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. निवडणुकांच्या आधीच शरद पवार यांना देखील नोटीस बजावून ईडीनं चौकशी केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. आता कधीकाळी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. या विधानामुळे विरोधकांना आयतंच कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षवर्धन पाटलांच्या विधानावरून राजकीय तर्क-वितर्क

हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये झालेल्या मेगाभरतीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा नेते म्हणूनच हर्षवर्धन पाटील हे एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपाचे अनेक नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. तेव्हा राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याविषयीच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील यांनी मिश्किलपणे टोला लगावला. मात्र, असं करताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे नवीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे.

“तुमच्या नेत्यालाच विचारा हर्षवर्धन पाटील का गेले”

एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपामध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे. “इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”, असं हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.  “हर्षवर्धन पाटील यांचं स्टेटमेंट वाचलं. ते कधीकाळी काँग्रेसचे नेते होते. आज ते भाजपामध्ये आहेत. ते म्हणाले की भाजपामध्ये गेलं की शांत झोप लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. या त्यांच्या एका वाक्यात सगळं सामावलेलं आहे”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshavardhan patil statement on inquiry ed after joining bjp pmw
First published on: 13-10-2021 at 13:37 IST