मुश्रीफांना नगरचे पालकमंत्रिपद नकोसे! ; जबाबदारीतून मुक्त करण्याची पक्षाकडे मागणी

विधान परिषदेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हा बदल त्यांना अपेक्षित आहे.

मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर : जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ काही दिवसांतच सोडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनीच व्यक्त केली. नगरचे पालकमंत्रिपद व कोल्हापूरचे पक्षाचे संपर्कमंत्रिपद अशा दोन जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. जिल्ह्य़ाच्या विकासात त्यांनी कधी रस दाखवला नाही की दोन वर्षांत करोना वगळता कधी कोणत्या स्थानिक प्रश्नासाठी बैठक घेतली नाही. त्यामुळे विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची, आरोप करण्याची संधी मिळाली आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी हा बदल त्यांना अपेक्षित आहे.

ज्येष्ठ मंत्री असूनही काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी कधीच स्वत:च्या जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद आत्तापर्यंत स्वीकारले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून नगरच्या पालकमंत्रिपदाचे त्रांगडे होऊन बसले आहे. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हवे होते; परंतु त्यांना ते मिळाले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुरुवातीला कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सोपवले गेले; परंतु ते त्यांनी नाकारले. त्या वेळी त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री पदासह विविध जबाबदाऱ्या होत्या. नंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडले.

जिल्ह्य़ात सध्या तीन मंत्रिपदे आहेत. काँग्रेसचे थोरात, शिवसेनेचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख या दोघांकडे कॅबिनेट, तर विविध खात्यांचा भार सांभाळणारे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे. राष्ट्रवादी आमदारांच्या प्राबल्यामुळे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे. मात्र तनपुरे राज्यमंत्री असल्याने त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमीच आहे.

येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या नगर व कोल्हापूरमधील जागेसह स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी साखर कारखान्यांच्या, बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची निवडणूकही होणार आहे. त्यांच्याच मतदारसंघातील पालिकांच्या निवडणुकाही आहेत. अशाच निवडणुका नगर जिल्ह्य़ातही आहेत. एकाच वेळी दोन्हीकडे लक्ष ठेवणे जमणार नाही, प्रचारासाठी जाता येणार नाही. त्यामुळे नगरच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करा, अशी गळ त्यांनी श्रेष्ठींकडे घातली आहे. इतरही काही जिल्ह्य़ांत असाच प्रश्न आहे. त्यामुळे एकटय़ा नगरसाठी बदल होणार का, हा प्रश्न आहे.

पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ जेव्हा नगरमध्ये आले, त्याच वेळी त्यांनी ‘मला काही सतत येणे जमणार नाही, महिन्यातून एकदा ‘जिंदा या मुरदा’ मी येऊन जाईल किंवा फारच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर येईल’ अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर ते सुरुवातीला महिन्यातून कधी तरी एकदा, नंतर दोन महिन्यांतून कधी तरी एकदा, आता तीन महिन्यांतून कधी तरी एकदा येत आहेत. केवळ करोनाच्या आढावा बैठका त्यांनी घेतल्या.

जिल्ह्य़ाच्या कोणत्या प्रश्नात कधी लक्ष घातले नाही. जिल्हा नियोजन समितीची बैठकही वर्षभरात झाली नाही. विविध जिल्हास्तरीय समित्यांच्या नियुक्त्यांसाठी रेंगाळल्या आहेत. ग्रामविकास पद आहे म्हणून नगर जिल्हा परिषदेच्या अडचणी सुटल्या, असे कधी घडले नाही. एक पथ्य मात्र त्यांनी जरूर पाळले ते म्हणजे जिल्ह्य़ाच्या स्थानिक राजकारणात, नेत्यांच्या संस्थांत, अगदी भाजपच्या असल्या तरी कधी त्यात लक्ष घातले नाही. त्यांना अडचण, त्रास होईल अशी भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. काही निर्णय घ्यायचा असेल तर मुंबईला या, असा त्यांचा खाक्या राहिला. त्यामुळे अनेकदा ‘पालकमंत्री हरवले आहेत’,  ‘पालकमंत्री दाखवा, एक हजाराचे बक्षीस मिळवा’, अशा स्वरूपाची टीका त्यांच्यावर झाली. मात्र मुश्रीफ यांनी त्याची कधी फिकीर केली नाही.

पालकमंत्रिपदी हसन मुश्रीफ असून नसल्यासारखेच होते. दोन वर्षांनंतर आता स्वत:च त्यांना जाहीर करावे लागत आहे, की मी अजूनही पालकमंत्री आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन पालकमंत्री येण्याची वाट न पाहता एकतर्फीच कार्यमुक्त होऊन जिल्ह्य़ाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा.

राम शिंदे, माजी पालकमंत्री, भाजप

आगामी काळात विधान परिषद, नगरपालिका, जिल्हा बँक, साखर कारखाने, जिल्हा परिषद अशा कोल्हापूर व नगर दोन्ही ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष देणे, प्रचार करणे अवघड जाणार आहे. शिवाय कोल्हापूर-नगर हे अंतरही जास्त आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या घेतलेल्या बैठकीत आपण नगरच्या पालकमंत्रिपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यावर आता पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. मात्र पक्षश्रेष्ठींनी नगरचे पालकमंत्रिपद कायम ठेवल्यास आपण यापुढेही प्रामाणिकपणे काम करू. 

हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hasan mushrif expected to step down as a guardian minister of ahmednagar zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या