हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनख नावाच्या शस्त्राने आदिलशाहाचा सरदार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शस्त्र सध्या इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी लंडनला रवाना होणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की केवळ शिवकालीन आहे? याबाबत राज्य सरकारने सरकारने खुलासा करावा. हे शस्त्र किती वर्षांसाठी महाराष्ट्रात असणार आहे? याबाबतची माहिती सरकारने जाहीर करावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, मी शुक्रवारी प्रसारमाध्यमांवर पाहिलं की वाघनखं लंडनहून आणली जाणार आहेत. आमचं महायुतीचं सरकार हे काम करतंय याचा मला आनंद आहे. तसेच ही वाघनखं इथं कोल्हापुरात ठेवली जाणार आहेत याचा मला जास्त आनंद आहे. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर हसन मुश्रीफ म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे आपल्या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. इतिहास जाणून घेतल्याशिवाय ते असं पाऊल उचलणार नाहीत. सुधीर मुनगंटीवार हे अतिशय अनुभवी आणि विदवान आहेत. त्यामुळे मुनगंटीवार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखंच इथे आणतील याची मला खात्री आहे. हे ही वाचा >> मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा रद्द, कारण काय? हसन मुश्रीफ म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी काय आक्षेप घेतलाय ते मला माहती नाही. आदित्य ठाकरे यांना वाघनखांची काय माहिती आहे याची मला माहिती नाही. परंतु, मला सुधीर मुनगंटीवार यांची खात्री आहे. ते आणतील ते योग्यच असेल.