पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी पुण्यात एका जाहीर सभेत बोलत असताना मंचावर बसलेल्या शरद पवारांचे कौतुक केले होते. शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो, असे विधान त्यांनी केले होते. मोदींचे हे विधान त्यावेळी चांगलेच गाजले. तसेच अधूनमधून या विधानाची आठवणही विरोधक करून देत असतात. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच या विधानाची आठवण करून दिली आहे. बारामती येथे शेतकरी-कामगार मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी या विधानावर भाष्य केलं.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान मोदी साहेब बोलतात खूप. एकदा तर त्यांनी सांगितलं की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हीताची नाहीत. व्यापाऱ्यांची मी नियोजित केलेली बैठक याआधी महाराष्ट्रात कधीही रद्द झाली नव्हती. मात्र यावेळी ती रद्द झाली, कारण एकप्रकारचा दबाव टाकला जात आहे. दबावानं समाजकारण, राजकारण करता येत नाही.

आमच्याकडे होलसेलमध्ये चोरी झाली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर लावून जनतेकडून १०० रुपये वसूल करतात आणि मग त्यातलेच सहा रुपये आपल्या खिशात टाकून म्हणतात मी तुम्हाला पैसे दिले. ही आहे मोदी गॅरंटी. जिथे सामान्य लोकांचे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून निवडणूकीत बटण दाबलं पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आमचा पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता आम्ही नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, पण तोच जुना कार्यक्रम घेऊन पुढे आलेलो आहोत”, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी संसदेत जेव्हा भेटतात, तेव्हा अतिशय प्रेमानं बोलतात. हे बोलणं ठीक आहे, पण करतात काय? त्याचं धोरणं काय? सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. पण आज सत्ता फक्त विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरली जात आहे. केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला. त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून आणि बाहेरून लोक यायला लागले. मात्र त्यांना आज तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

“काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे. पण एक अट आहे. मी तुम्हाला मत मागितलं, तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर ज्या नावाने, ज्या पक्षाच्या चिन्हावर मत मागितले, तेच नाव, पक्ष, सगळं तुम्ही विसरला. मग तुम्ही लोकांची फसवणूक करत नाही का? राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार गटावर पक्ष चोरल्याची टीका केली.