गेल्या वर्षी बीड येथील स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकारामुळे व्यथित होत माळकोळी (तालुका लोहा, जिल्हा नांदेड) येथील जालिंदर कागणे यांनी धाडसी निर्णय घेतला, तो विवाहाच्या वेळी घेतलेला हुंडा परत करण्याचा! सासूरवाडीच्या लोकांनी हुंडा परत घेण्यास नकार दिला. पण कागणे यांनी यावर उपाय शोधला. हुंडय़ात घेतलेले एक लाख रुपये ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला देण्याचा निश्चय केला.
१९९९मध्ये जालिंदर यांचा विवाह अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील दिवंगत चंद्रकांत मुंडे यांची कन्या संगीता हिच्याशी झाला. जालिंदर मंदिर शिल्पाचे काम करतात. गावातील दारूबंदीसाठी तुरुंगात जाणारी आई चंद्रकलाबाई व वडील रामजी कागणे यांच्याकडे जालिंदर यांनी हुंडय़ातील एक लाख रुपये परत करण्याचा विषय काढला.
पत्नी संगीताला हुंडा परत करण्याचा निर्धार सांगितला. सासूरवाडीपर्यंत ही चर्चा गेली. सासरे नाहीत. सासू शांताबाई काहीच सांगेनात. हुंडा परत घ्यायचा कसा, आतापर्यंत कोणीच घेतला नाही. लोक काय म्हणतील, याची त्यांना भीती. मेव्हणा गिरीधर मुंडे यानेही बहिणीच्या विवाहात दिलेला हुंडा परत घ्यायला स्पष्ट नकार दिला. मात्र जालिंदरने आपल्या मित्रांना हा निर्धार सांगितला. मित्रांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर) हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी साहित्यिक अमर हबीब यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘आत्मक्लेशा’तून १४ वर्षांनी हुंडा परत केला!
गेल्या वर्षी बीड येथील स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकारामुळे व्यथित होत माळकोळी (तालुका लोहा, जिल्हा नांदेड) येथील जालिंदर कागणे यांनी धाडसी निर्णय घेतला,
First published on: 24-09-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He returned dowry after 14 years