रायगड जिल्ह्यतील ५२ आरोग्यकेंद्र, २५५ उपकेंद्र नऊ ग्रामिण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचा कायापालट केला जाणार आहे. ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी. हा यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पाला मिशन कायापालट असे नाव देण्यात आले आहे. कोल्हापुरच्या धर्तीवर हा प्रकल्प जिल्ह्यत राबविला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकलेली नाही. आजही दुर्धर आजारांवरील चांगल्या उपचारांसाठी जिल्ह्यतील रुग्णांना मुंबई अथवा नवी मुंबईतील रुग्णालयांची मदत घ्यावी लागते आहे. योग्य वेळी आणि तातडीचे उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जीवही धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणा बळकट आणि कार्यक्षम करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शासकीय रुग्णालयांच्या पायाभुत विकास या माध्यमातून केला जाणार आहे. त्याच बरोबर रुग्णालयाच दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. या प्रकल्पाला मिशन कायापालट असे नाव देण्यात आले आहे.
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ही संकल्पना तिथे राबविली होती. ज्याची देशपातळीपर्यंत दखल घेण्यात आली होती. राज्यभरात मिशन कायापालट म्हणून तर केंद्रात मिशन कायाकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला होता. कोल्हापुरमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या डॉ. सूर्यवंशी यांनी आता रायगड जिल्ह्यत हे मिशन कायापालट प्रकल्प राबविण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा सर्व ठिकाणी इमारतींची अंतर्गत व बा स्वच्छता, रंगरंगोटी. रुग्णसेवेसाठी मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब व त्याचे तंतोतंत पालन, रुग्णालयापर्यंत दिशादर्शक फलक, लांबून रुग्णालय ओळखू यावे यासाठी दर्शनी कमान , परिसर स्वच्छता, सुसज्ज औषधालये, बाह्य रुग्णांसाठी प्रतिक्षालये, पिण्याचे शुद्ध पाणी, उद्यान सुविधा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण वर्तन, आवश्यक उपकरणांची उपलब्धता, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचे सहकार्य मिळविणे, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (वस्तु स्वरुपात) उपलब्ध करुन आवश्यक बाबींची पूर्तता करणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
जिल्ह्यात मिशन कायापालट राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची पुर्वतयारी बठक नुकतीच माळरान कृषि पर्यटन केंद्र, राजमाळा येथे आयोजित करण्यात आली होती. या बठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, यांच्यासह विविध विभागांतील आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दिवसभर चाचलेल्या या बठकीत कोल्हापुरचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी व विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉ. रामजी अडकेकर, कोल्हापुरच्या जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, भेडसगाव ता. शाहुवाडी जि. कोल्हापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी हे उपस्थित वैद्यकीय यंत्रणेस मार्गदर्शन केले.
यावेळी डिसेंबरअखेपर्यंत आरोग्यकेद्र निहाय सुविधांचे मुल्यमापन करून अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या .
शासकीय दवाखान्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे, येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आणि त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे. हा या मिशन कायापालट आभियानाचा उद्देश असेल. स्थानिकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प जिल्हाभरात राबविला जाईल.
–डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड