सातारा : मांढरदेव (ता. वाई) परिसरामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्यावरील घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दरडी कोसळल्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून रस्ता मोकळा केला.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र मांढरदेवला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षे होवूनही हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. या दोन्ही घाटांचे काम करत असताना रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणांवरील डोंगर भाग तोडण्यात आलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने डोंगर फोडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काम करत असताना संबंधित कंत्राटदाराकडून दरड न कोसळण्याची कोणतीच दक्षता घेतलेली नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळू लागल्या आहे. शनिवारी घाटात दरड कोसळली. या घटनेत कोणतीही वित्तहानी झाली नाही. घटनेनंतर बांधकाम विभागाने कोसळलेली दरड तातडीने हटवली.