बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पाऊस पडत असून, त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी (१ ऑगस्ट) मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागाला पावसाने झोडून काढले. वरच्या धरणांमधून पाणी सोडणे सुरू असल्याने पुणे-सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवरील बहुचर्चित उजनी ५३ टक्के भरले आहे, तर मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात पाणी येणे सुरू झाले आहे.
राज्यात गुरुवारीसुद्धा पाऊस कायम राहील. विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा जोर जास्त असेल. या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसासह १-२ ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अशा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागपूर- विदर्भाच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्य़ांना बुधवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. मुख्यमंत्र्यांचा गेल्या शनिवारचा दौरा झाल्यानंतर विदर्भातील शेतकरी पॅकेजच्या प्रतीक्षेत असताना पुन्हा परतलेल्या पावसाने चार जिल्ह्य़ांमधील एकूणच स्थिती पार विस्कटून टाकली. विदर्भातील सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने जागोजागी वाहतूक विस्कळीत झाली. काही भागात पुलांवरून पाणी वाहात असून धरणे भरून वाहात आहेत. वर्धा जिल्ह्य़ात धरणातून पाणी सोडण्यात आल्याने दोघे वाहून गेले. चंद्रपुरात पावसाच्या रेटय़ाने गोदामाची भिंत कोसळून दोघांचा बळी गेला. त्यामुळे पाऊसबळींची संख्या ११० झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात बुधवारी पावसाला जोर होता. हे धरणांचे क्षेत्र असल्याने अनेक धरणांमधून पाणी सोडणे सुरू होते. कोयना धरण, कृष्णा नदीवरील धोम, बलकवडी धरणे तसेच, राधानगरी, वारणा या धरणांमधून पाणी सोडणे सुरूच आहे.
बुधवारी दिवसभरात पडलेला  पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मुंबई सांताक्रुझ ३, अलिबाग ४, रत्नागिरी ६, डहाणू २, भीरा २७,  पुणे ८.३, अहमदनगर १७, कोल्हापूर ८, महाबळेश्वर १२१, सांगली २, सातारा २३, सोलापूर ११, नाशिक ६, जळगाव ११, औरंगाबाद १२, परभणी १८, अकोला २३, अमरावती ७, बुलढाणा २५, ब्रह्मपुरी ५७, चंद्रपूर ५२, गोंदिया ३८, नागपूर २८, वाशिम २३, यवतमाळ २७.