सोलापूर शहर व परिसरात सतत सहाव्या दिवशी उत्तरा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत २३.९८ मिमी सरासरीने २६३.८२ मिमी पाऊस पडला. शुक्रवारी रात्रभर संततधार पाऊस पडत राहिला. माळशिरसमध्ये सर्वाधिक ५३ मिमी, तर करमाळय़ात ३९.१३ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ात आतापर्यंत ८०.७५ टक्के पाऊस झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी सायंकाळी सहानंतर पावसाला प्रारंभ झाला. नंतर मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत पाऊस पडत राहिला. शहरात सर्व रस्ते जलमय झाले होते. विशेषत: सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. शहरात एका इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्हय़ात तालुकानिहाय गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी  अशी : माळशिरस-५३, करमाळा-३९.१३, उत्तर सोलापूर-२९.५०, माढा-२६.४८, बार्शी-२३.४०, पंढरपूर-२१.३३, दक्षिण सोलापूर-१८.९०, मोहोळ-१८.०८, अक्कलकोट-१७.४४ याप्रमाणे पावसाने जोमदार हजेरी लावली. तर तुलनेत मंगळवेढा-६.४०, सांगोला-१०.१६ या भागांत कमी पाऊस झाला. आतापर्यंत जिल्हय़ात ३४१.४४ मिमी सरासरीने ३७५५.८९ मिमी पाऊस झाला आहे.

 

सातारा जिल्ह्यत संततधार

सातारा : सातारा जिल्ह्यत सर्वच तालुक्यात परतीचा पाऊस सुरु असून शुक्रवारी सातारा, महाबळेश्वर तसेच दुष्काळी फलटण, कोरेगाव, खंडाळा, माण तालुक्यात जोरदार पाऊस पडला. या पावासाने फलटण-लोणंद मार्गावरील िनभोरे गावातील ओढय़ास पाणी आले असून जुन्या स्टँडवरील सर्व दुकाने पाण्याखाली गेली होती. फलटण येथील सुंदरनगर कॉलनी जलमय झाली होती. सातारा शहर व परिसरात दिवसभर पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. दोन दिवस सूर्यदर्शन झाले नाही. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मंडई तसेच बाजारपेठेतील ग्राहक -विक्रेत्यांची दैना उडाली होती. शहर व परिसरात पावसाचा जोर आहे. जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवला आहे.

सातारा तालुक्यात गेल्या बारा तासात ९ मि.मी.,जावली ४.२ मि.मी.,पाटण १८ मि.मी.,कराड ५.६मि.मी,कोरेगाव २३ मि.मी.,खटाव २०मि.मी.,माण १८ मि.मी.,फलटण ३८ मि.मी.,खंडाळा ६ मि.मी.,वाई ०.४ मि.मी.,महाबळेश्वर ४३ मि.मी. पाऊस पडला.कोयना धरणातून २३ हजार ९०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.धोम धरण ३८६ क्युसेक,कण्हेर धरणातून ५९९ क्युसेक ,उरमोडी ४०० क्युसेक,तारळी ६० क्युसेक,मोरणा गुरेघर ८१० क्युसेक ,वीर धरण १९८० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.या पावसामूळे काढणीस आलेले सोयाबीन ,घेवडा,मूग,उडीद व अन्य पिके भिजल्यामुळे नुकसान होत आहे.

दुष्काळी भागातील सर्वच नाले , ओढे, तलाव परतीच्या पावसाने भरले आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हात दिला असला तरी सोयाबिन ,घेवडा ,मूग आदी पिके मात्र हातची जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in solapur
First published on: 25-09-2016 at 01:00 IST