अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिंगळाई नदीला पूर आला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अतिपावसामुळे सुमारे आठ गावे बाधित झाली. या गावांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) दाखल झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने पुराचे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या चोवीस तासांत अमरावती जिल्ह्यात ७५.२ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक १२५.५ मिमी. पावसाची नोंद ही तिवसा तालुक्यात झाली. पावसामुळे पिंगळाई नदीला पूर आला. तिवसा शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जावे लागले. सध्या पूर ओसरला आहे. अतिवृष्टीमुळे तिवसा, तळेगाव ठाकूर, सातरगाव, वरूडा, तारखेड, वरखेड, निंभोरा, भारसवाडी ही गावे सर्वाधिक बाधित झाली. अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. माजी मंत्री व तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी आयोजित जनता दरबार रद्द करून तिवसा गाठले आणि बाधित गावांची पाहणी सुरू केली. त्यांनी कृषी विभागाला शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.