रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाचा मोठा फटका लांजा तालुक्याला बसला आहे. पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील माचाळ या ठिकाणी रस्त्यातच दरड कोसळल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही पर्यटक याभागात अडकून पडले आहेत.

जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या चौविस तासात पावसाने लांजा तालुक्यात जास्त हजेरी लावली आहे. या तालुक्यात १११.४० मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. लांजा तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाचा मोठा फटका येथील पर्यटनस्थळ असलेल्या माचाळला बसला आहे. माचाळ गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी मोठी दरड कोसळल्याने माचाळ गावाचा संपर्क तुटला.

माचाळ खिंड येथे तीव्र असलेल्या घाटात ही मोठी दरड कोसळल्याने माचाळ पर्यटन क्षेत्राकडे जाणारा रस्ता पूर्णतः ठप्प झाला. दरड पडल्याने माचाळ व लांजाकडे दोन्ही बाजूनी ये-जा करणारी वाहने घाटात अडकून पडली होती. काही तास हा रस्ता पुर्ण बंद झाल्याने बांधकाम विभागाने दरड हटविल्या नंतर या मार्गातून वाहतुक पूर्ववत करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होत आहे. जिल्ह्यात गेल्या चौविस तासात एकूण पाऊस ५२१.४२ मिमी तर सरासरी ५७.९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुकानिहाय आकडेवारी नुसार, मंडणगड तालुक्यात ४७.७५ मिमी, खेड तालुक्यात ३४.७१ मिमी, दापोलीत ६४.४२ मिमी, चिपळूण तालुक्यात ३८.७८ मिमी, गुहागर मध्ये ५६.२० मिमी, संगमेश्वर मध्ये ३३.०० मिमी, रत्नागिरीत ६०.६६ मिमी, लांजा तालुक्यात १११.४० मिमी तसेच राजापूर तालुक्यात ७४.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.