घरगुती वार्षिक खरेदी व लग्नसराई यामुळे बाजारात लाल मिरचीची मागणी लक्षणीय वाढली आहे. गारपिटीमुळे चांगल्या दर्जाचा माल कमी झाल्यामुळे आहे त्या मालाचे भावही गगनाला भिडले आहेत. प्रामुख्याने मिरचीचा भावातील तिखटपणा ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झोंबत असल्याचे दिसते.
बाजारात १०० ते २०० रुपये प्रतिकिलो असे लाल मिरचीचे भाव आहेत. दैनंदिन आहारात लाल मिरचीचा समावेश अनिवार्य असतो. जेवण झणझणीत व चवीचे व्हायचे असेल, तर लाल तिखटाला पर्याय नाही. लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. देशातील ८० टक्के लोक आजही बाजारपेठेतील मनासारखी आवडणारी लाल मिरची विकत घेऊन ती कांडून वापरणेच पसंत करतात. सुमारे २० टक्के लोक, यात हॉटेल व्यावसायिक व नोकरदार मंडळी तयार तिखट खरेदी करतात.
शरीराची सुस्ती घालवण्यासाठी, तसेच शरीर तरतरीत ठेवण्यासाठी व निद्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी आहारात लाल मिरचीचा वापर केला जातो. लाल मिरचीचे असंख्य प्रकार आहेत. घरगुती मागणी असणाऱ्या प्रकारांत बेडगी, गुंटूर, तेजा, संकेश्वरी या मिरचीचा समावेश होतो. नव्याने विविध संकरीत जातीही बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यात रेशीमपट्टा, कश्मिरी, वंडरहॉट, टमाटा, डीडी, सनम, सिंगलपट्टी, २७३, ३४१ हे प्रकार मिरची पावडर उत्पादक मोठय़ा प्रमाणात आणतात. आंध्र प्रदेशात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन होते. यापाठोपाठ मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातेत मिरचीचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक राज्यात उत्पादित होणाऱ्या मिरचीची चव व स्वाद वेगवेगळा असतो.
आंध्रातील गुंटूर जिल्हय़ात उत्पादित होणारी मिरची (गुंटूर) नावाने ओळखली जाते. या मिरचीचा रंग चमकदार, चवीला मध्यम तिखट, दीर्घकाळ रंग टिकणारी व चवदार यामुळे ही मिरची सर्वदूर प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील बेडगी विभागात उत्पादित होणारी बेडगी मिरची रंगास भडक, सौम्य तिखट, भरपूर चवदार व स्वादिष्ट असल्यामुळे कमी तिखट खाणारे लोक व तारांकित हॉटेलमध्ये या मिरचीला चांगली मागणी आहे. आंध्रातील खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभरात सर्वात जास्त जहाल तिखट म्हणून ओळखली जाते. जास्त तिखट खाणारे लोक या मिरचीस प्राधान्य देतात.
महाराष्ट्रात पिकणारी गावरान मिरची तिखट असते. पण तिचा रंग जास्त दिवस टिकत नाही. या मिरचीस त्या त्या हंगामात मागणी असते. त्यामुळे शेतकरी हिरवी मिरची विकण्यावरच प्रामुख्याने भर देतात. आंध्रातील प्रमुख बाजारपेठेतून फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिरचीची आवक मोठय़ा प्रमाणात होते.
लातूर बाजारपेठेत आंध्र व कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात मिरचीची आवक होत असून, त्याची चांगली उलाढाल असल्याचे लातूर जिल्हा  लाल मिरची असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप स्वामी यांनी सांगितले. लातूर बाजारपेठेत ड्राय डिलक्स गुंटूर मिरची १२० ते १३० रुपये प्रतिकिलो, ड्राय डिलक्स बेडगी १६० ते २०० रुपये, ड्राय डिलक्स तेजा १२० ते १३० रुपये, तर मध्यम दर्जाची गुंटूर तेजा १०० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
गारपिटीचा गुणवत्तेला तडका!
मे महिन्यापासून देशांतर्गत मिरचीची मागणी वाढते. त्यामुळे चांगल्या मालाच्या दरात या वर्षी २० टक्के वाढ झाली आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे आंध्र प्रदेशात मिरचीचे अतोनात नुकसान झाले. ८० टक्के माल कमी गुणवत्तेचा आहे. मालाची प्रत कमी असल्यामुळे चांगल्या दर्जाच्या मालाला अधिक भाव मिळत आहे.