मुंबई : पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या तब्बल १५० संस्थांची तपासणी होईल. यामध्ये वर्गखोल्यांचा आकार, प्राध्यापक संख्या, आवश्यक सोयीसुविधा तपासल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांची तपासणी ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग या संस्थांवर कारवाईबाबत निर्णय घेणार आहे.
औषधनिर्माणशास्त्राच्या ‘बी. फार्म’ आणि ‘डी. फार्म’ या अभ्यासक्रमासाठी असलेल्या संस्थांची संख्या गेल्या तीन वर्षांत सुमारे दीडशेने वाढली. २०२२-२३ मध्ये फार्मसीचा पदवी अभ्यासक्रम म्हणजेच ‘बी. फार्म’ शिकविणाऱ्या ३९६ संस्था होत्या. याच काळात ‘डी. फार्म’ म्हणजेच पदविका अभ्यासक्रम शिकवणाऱ्या ४९२ संस्था होत्या. २०२४-२५ पर्यंत बी. फार्म संस्थांची संख्या ५१५ तर डी. फार्म संस्थांची संख्या ६८५ वर पोहचली आहे. या सर्व संस्थांना भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून मान्यता मिळाली असली तरी त्या सर्व निकष पूर्ण करतात का, याची तपासणी राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने याबाबत ३० एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक काढत भारतीय औषधनिर्माणाास्त्र परिषदेने तयार केलेल्या मानक तपासणी स्वरूपानुसार या सर्व संस्थांची झाडाझडती घेण्याचे निर्देश दिले. या निर्देशांनुसार काही महत्त्वाच्या निकषांवर या संस्थांची तपासणी होणार आहे. निकषांची पूर्तता न करणाऱ्या संस्थांना टाळे ठोकण्याची शिफारस उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून भारतीय औषधनिर्माणाास्त्र परिषदेकडे करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
आवश्यक निकष काय?
– डी. फार्मसाठी दोन तर बी. फार्मसाठी चार वर्ग खोल्या बंधनकारक
– वर्गखोल्यांचे क्षेत्रफळ ७५ चौरस मीटर असणे गरजेचे
– बी. फार्मसाठी १० आणि डी. फार्मसाठी ३ प्रयोगशाळा
– साधारण सामानासाठी १०० चौरस मीटर आणि ज्वालाग्राही पदार्थांसाठी २० चौरस मीटरची एक खोली
– ६० विद्यार्थ्यांच्या डी. फार्म अभ्यासक्रमासाठी एक प्राचार्य आणि सहा अधिव्याख्याते
– बी. फार्मच्या अभ्यासक्रमासाठी चार प्राचार्य, १० फार्मास्युटिकल केमिस्ट्री, दोन फार्मास्युटिकल ॲनॅलिसिस, १० फार्माकॉलॉजी, ९ फार्माकोग्नॉसी, १० फार्मास्युटिक्स असे चार वर्षांसाठी ४५ प्राध्यापक आवश्यक
विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा
प्रत्येक संस्थेत मुलींसाठी आणि मुलांसाठी एक-एक संलग्न खोली असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी १०० चौरस मीटर क्षेत्रफळाची वेगवेगळी स्वच्छतागृहे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थेत पिण्याच्या पाण्याचा एक कूलर असावा, संस्थेकडे १५० चौरस मीटरचे एक स्वतंत्र वाचनालय, ८० चौरस मीटरचे एक प्राणी घर आणि ५० चौरस मीटरचे एक संग्रहालयही असणे आवश्यक आहे.