लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगली बाजार समितीमध्ये शुक्रवारी झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला ३० हजार रुपये प्रतिक्विंटल असा चालू हंगामातील सर्वोच्च दर मिळाला. बाजारात हळदीला सरासरी २१ हजार ५५० रुपये दर असून, आवकही वाढत असल्याचे बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले.

कर्नाटकातील सदाशिव माप्पा शिनदोळी (रा. गुरलापूर जि. बेळगाव) यांनी हळद विक्रीसाठी सांगली बाजार समितीच्या बंडा बाळा फराटे या अडत दुकानात सौद्याला लावली होती. हळदीची गुणवत्ता पाहून यू. के. खिमजी अँड कंपनीने ही हळद ३० हजार प्रति क्विंटल या सर्वोच्च दराने खरेदी केली. चांगल्या पद्धतीची हळद आणल्याबद्दल शिनदोळी यांचा बाजार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढत असून, गुरुवारी ९ हजार ९८८ क्विंटल हळद आवक झाली. तर सौद्यात १३ हजार ६१४ क्विंटल हळदीची विक्री झाली. गुरुवारी झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला किमान १३ हजार १०० तर कमाल ३० हजार प्रति क्विंटल दर मिळाला असून, सरासरी दर २१ हजार ५५० रुपये असल्याचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. तर परपेठेतून बाजारात २ हजार ८५६ क्विंटल हळदीची आवक झाली असून, सरासरी दर १२ हजार ६०० रुपये असल्याचे समितीतून सांगण्यात आले.