“आमच्यासह संपूर्ण देश या निर्णयाला घेऊन नाराज आहे, आपल्या सुरक्षेसाठी हिजाब परिधान करणं चुकीचं नाही, देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हिजाब परिधान केला जातो तेव्हापासून कोणीही याला विरोध केला नव्हता मग आता विरोध का? लवकरच याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात जातील, लागेल ती मदत आम्ही करणार आहोत. असं काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, भाजपाकडून हा निवडणुकीचा मुद्दा बनवला जात असल्याचा आरोप केला आहे. शिवाय, १९४७ पासून माता-भगिनी हिजाब परिधान करत आहेत, मग आताच काय अडचण आहे? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
Hijab Row: हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही; कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनी म्हटले की, “आज माझ्यासह देशभरात अनेकजण नाराज आहेत. जे जे होत आहे ते खूप दुर्दैवी आहे. आजच्या निर्णयामुळे आम्ही सर्वजण नाराज आहोत. कारण, एका भगिनीस मग ती मुस्लीम असेल किंवा हिंदू, जर तिला हिजाब किंवा घुंघट परिधान करायचा असेल आपले शील आणि अब्रूसाठी तर तिला अडवल गेलं नाही पाहिजे. इतिहास साक्षीदार आहे की आपल्या माता-भगिनी, आजी, पणजी सर्वजणींना जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तेव्हापासून कोणी अडवलेलं नाही. तर मग आता काय अडचण आहे? याला राजकीय मुद्दा का बनवलं जात आहे? मला विश्वास आहे की याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात नक्कीच जातील आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना जर माझी कुठलीह मदत लागली, तर मी नक्कीच मदत करेन. मला विश्वास आहे की आम्हाला सर्वोच्च न्यायालयात नक्कीच न्याय मिळेल.”
तसेच, “आमचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आमच्या दृष्टीने जर आमच्या बहिणींना हिजाब परिधान करायाचा आहे. तर त्यामध्ये अडचण काय आहे? त्या आपल्या सन्मानासाठी, शीलतेसाठी परिधान करत आहेत आणि केवळ मुस्लीमच नाही तर कोणत्याही धर्माची आमची बहीण असेल, जर तिला आपल्या सन्मानासाठी काही परिधान करायचं आहे तर तिला अडवलं नाही पाहिजे, अडवणं अतिशय चुकीचं असेल.” असंही सिद्दीकी यांनी सांगितलं.
आता भाजपा याला राजकीय मुद्दा बनवत आहे आम्ही नाही –
याचबरोबर, “मी सहमत आहे की याला मुद्दा नव्हतं बनलं पाहिजे. मुद्दा भाजपा बनवत आहे. हा मुद्दाच नव्हता बनवला पाहिजे. १९४७ पासून हे सुरू आहे, आमच्या भगिनी हिजाब परिधान करत आहेत. तेव्हापासून त्यांना अडवलं नाही गेलं, आता भाजपा याला मुद्दा का बनवत आहे?, मुद्दा ते बनवत आहेत, राजकीय दिशा ते देत आहेत, निवडणुकीचा मुद्दा ते बनवत आहेत आम्ही नाही.” असा आरोप काँग्रेस आमदार सिद्दीकी यांनी भाजपावर केला.
याशिवाय, “शाळांमध्ये आताच नाहीतर वर्षांनुवर्षे आमच्या भगिनी हिजाब परिधान करत आहेत आणि त्यांना रोखलं जात नाही. यासाठीच हा नियम केवळ मुस्लीमांसाठीच नाही, हिंदू भगिनी किंवा कोणत्याही धर्मातील भगिनी जर आपली सुरक्षा, सन्मान आणि शीलतेसाठी काही परिधान करू इच्छित असेल तर त्यांना अडवलं नाही पाहिजे. त्यांना आपल्या देशात काहीही परिधाना करण्याचे स्वातंत्र्य असायला हवं, जे त्यांना अडवत आहेत ते चुकीच करत आहेत.” असं देखील झीशान सिद्दीकी यांनी बोलून दाखवलं.