स्फोटकं प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी वैभव राऊत याच्या समर्थनार्थ आज नालासोपारा येथे एक मोर्चा काढण्यात आला. देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो अशा घोषणा हिंदुत्त्ववाद्यांनी दिल्या. या मोर्चात ७ ते ८ हजार नागरिक सहभागी झाले होते. यावेळी एटीएसच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. या मोर्चात अनेक हिंदुत्त्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात सहभागी होण्यासाठी पालघरपासूनचे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आले होते.

निषेध मोर्चा आज निघणार हे ठाऊक असल्याने पोलिसांनी मागील चार ते पाच दिवसांपासून खबरदारी घेतली होती. ज्यामुळे या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी गुरुवारी शहरात संचलन केले. अनेकांना प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवण्यात आल्या असून मोर्चातील प्रत्येक हालचालीवर पोलीस बारकाईने नजर ठेवून होते.

नालासोपारा भंडार आळीत राहणाऱ्या वैभव राऊत याला नुकतीच राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. त्याच्या घर आणि दुकानातून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे, बॉम्ब, स्फोटके जप्त करण्यात आली होती. मात्र वैभव याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला असून त्याच्या अटकेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता भंडार आळीपासून नालासोपारा पश्चिमेच्या सिविट सेंटरसमोरील पाचमुखी मारूती मंदिरापर्यंत हा मोर्चा निघाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.