हिंगोली : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आहे. जलजीवन मिशनकडून खोदकाम केले अन् दुरुस्ती केली नाही. त्यामुळे वाहनातून जाताना खड्डा लागला की, लोक आम्हाला शिव्या घालतात. आता रस्ते कधी सुधारणार ? असा सवाल करीत आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा या विभागाच्या कामाचे वाभाडे काढले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण काकाटे, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली. सर्व ठिकाणी योग्य पंचनामे झाले पाहिजेत, अशा सूचना पालकमंत्री झिरवाळ यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टीमुळे ५६ पुलमोऱ्या नादुरुस्त झाल्याचे सांगत दुरुस्तीसाठी ५५ कोटींचा निधी लागणार आहे. तसेच १० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची किरकोळ दुरुस्ती तर ५६ किलोमीटर अंतरामध्ये नव्याने रस्ते बांधकाम करणे आवश्यक असून, त्यासाठी ३३ कोटींचा निधी लागणार असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार नवघरे व आमदार बांगर यांनी रस्त्यावरील खड्डे कधी दुरुस्त करणार, असा सवाल उपस्थित केला. नागरिक वाहनांद्वारे जात असताना खड्डा लागल्यानंतर लोकप्रतिनिधींना शिव्या घालत आहेत. हयातनगर ते जोडजवळा या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. आताच रस्ता उखडत असून, केवळ कंत्राटदारांना पोसण्याचे काम करू नका, अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. गांगलवाडी येथील पुलाची दुरुस्ती झाल्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांचे आमदार बांगर यांनी पितळ उघडे पाडले. पुलच झाला नाही तर दुरुस्ती कशी केली ? असा सवाल केला. मात्र, या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले.
जिल्ह्यात ‘जलजीवन’ अंतर्गत २१६ कामे पूर्ण झाली, त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती देणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, बैठकीत आरोग्य विभागाने कळमनुरी, वसमत येथे डायलेसीस केंद्र सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. परिचारिकांच्या रिक्त जागांचा मुद्दाही चांगलाच गाजला. ३०० जागा मंजूर असताना केवळ ९९ परिचारिका कर्मचाऱ्यांवर काम चालते, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वीज कंपनी, जि. प. बांधकाम विभाग, पोलीस विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.