मुंबईमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ८ सप्टेंबरपर्यंत जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर) रोजी मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील सर्व शाळ आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटवरुन बुधावारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही माहिती दिली.

मुंबईमध्ये सोमावार पासूनच थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. त्यामुळेच शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी साठल्याने रस्ते वाहतुकीला फटका बसला. तसेच अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुंबईमध्ये पुढील ४८ तासांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ‘आज (बुधवारी) पडलेला जोरदार पाऊस आणि हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील शाळांना ५ सप्टेंबर २०१९ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा,’ असं ट्विट शिक्षणमंत्री शेलार यांनी केले आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नोकरदार मुंबईकर कार्यलयांमध्ये तसेच वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. अनेक स्थानकांवर शेकडो प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढावी लागल्याचे चित्र दिसले.