छत्रपती संभाजीनगर : येत्या खरीप हंगामाचे छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रस्तावित क्षेत्र यंदा वाढले असले तरी संभाजीनगर जिल्ह्यात मात्र सरासरी पेरणी क्षेत्रात किंचितसी घट झाली आहे. विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये मिळून सरासरी पेरणीचे एकूण २१.४२ लाख हेक्टर तर प्रस्तावित २१.५३ लाख हेक्टर क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. या संदर्भातील माहिती कृषि विभागाच्या सहसंचालक कार्यालयाकडून मिळाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेरणीच्या क्षेत्रात गतवर्षी ६.८५ लाख हेक्टरचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र होते. यंदा ते ६.८२ लाख हेक्टर दर्शवण्यात आले आहे. तर प्रस्तावित खरीप क्षेत्र ६.९१ लाख हेक्टर आहे. गतवर्षी ६.७५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती.
जालना व बीड जिल्ह्यात मात्र, खरिपाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालेली दिसण्याचा अंदाज आहे. जालन्यात गतवर्षी सरासरी पेरणीचे क्षेत्र ६.१९ लाख हेक्टर होते. तर प्रत्यक्ष ६.३० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा ६.५१ लाख हेक्टर सरासरी पेरणीचे क्षेत्र असून, प्रस्ताविक क्षेत्रही तेवढेच आहे. बीड जिल्ह्यात गतवर्षी सरासरी पेरणीचे क्षेत्र ७.८६ लाख हेक्टर होते, तर प्रत्यक्षात खरीप पेरणीचे क्षेत्र ८.०९ लाख हेक्टर होते. यंदा बीडमध्ये सरासरी पेरणीचे क्षेत्र ८.०९ तर प्रस्तावित क्षेत्र ८.११ लाख हेक्टर आहे.
काही क्षेत्रात पावसाला उशिर झालेला असेल किंवा काही क्षेत्रावर फळबागांचे नियोजन केलेले असेल तर पेरणीच्या क्षेत्रात घट होत असते. छत्रपती संभाजीनगरबाबत असेच कारण आहे.- डाॅ. प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक