वाशिममध्ये इयत्ता बारावीत असणाऱ्या साक्षी बोरकर या मुलीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी घरात वडिलांचा मृत्यूदेह असतानाही साक्षीने परीक्षा केंद्र गाठून १२ वीची परीक्षा दिली. बुधवारी (८ जून) १२ वीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये साक्षीने ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
रिसोड तालुक्यातील वडजी येथील शेतकरी रामेश्वर शेषराव बोरकर यांचे ४ मार्च रोजी निधन झाले होते. त्याच दिवशी मुलगी साक्षीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. घरात वडिलांचा मृतदेह असतानाही साक्षीने स्वतःला दुःखातून सावरलं आणि परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. साक्षीची इंग्रजी विषयाची परीक्षा संपल्यानंतर तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. साक्षीने सकाळी ११ ते २ या वेळेत परीक्षा दिली आणि मग २ नंतर आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केलं.

साक्षीच्या या कणखर निर्णयानंतर अखेर बुधवारी १२ वीचा निकाल जाहीर झाला. यात साक्षीला ९० टक्के गुण मिळाले. इंग्रजीच्या पहिल्याच विषयात तिला ७९ गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतरांनीही संकटकाळात न डगमगता ताकदीनिशी संकटाचा सामना केल्यास यश संपादन होऊ शकते हेच साक्षीने दाखवून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Maharashtra HSC Result 2022 : यंदा प्रवेश सुकर ; बारावीचा ९४.२२ टक्के विक्रमी निकाल; गेल्या वर्षी वाढविलेल्या जागांचा या वर्षी फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकालानंतर साक्षी बोरकर म्हणाली, “माझी ४ मार्चला इंग्रजी विषयाची परीक्षा होती. त्याचवेळी ब्रेन हॅमरेज होऊन माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतरही आज मला ९० टक्के गूण मिळाले. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे धन्यवाद मानते. कारण त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. माझ्या वडिलांना आज खूप अभिमान वाटला असता. ते आज माझ्यासोबत नाहीत, मात्र ते जेथे असतील तेथे त्यांना माझा अभिमान वाटत असेन.”