गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या संकट काळात विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान देखील झालं. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेक वर्ग ऑनलाईन झाले. महाराष्ट्रात आत्ता कुठे शाळा काही प्रमाणात सुरू होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर किमान पुढील वर्षी तरी १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार का? आणि होणार तर कधी आणि कशा होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता या परीक्षांचा मुहूर्त ठरला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी अर्थात २०२२ साली १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी होणार असून १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.

लेखी परीक्षा किती काळ चालणार?

“ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत. पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा कधी?

“१२वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तर १०वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

कशा होणार परीक्षा?

दरम्यान, करोना काळात परीक्षांचं स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. “मागील काळात जशी ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचं असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं.

कधी लागणार निकाल?

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. १२वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व परीक्षा करोना नियमांचं पालन करूनच पार पडतील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.