scorecardresearch

महाबळेश्वर – पाचगणीत पर्यटकांची गर्दी

करोनाचे सगळे निर्बंध उठल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या मोठय़ा गर्दीने गजबजून गेली आहेत.

विश्वास पवार, लोकसत्ता

 वाई : सलग सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. दिवसभर विविध पॉइंट्सवर आणि बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या एकूणच महाबळेश्वरला जत्रेचे स्वरूप आले आहे. मात्र पर्यटकांच्या अतिधाडसाने त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचेही बघायला मिळते. भरधाव वेगातील वाहने, गाडय़ांची गर्दी, वाहतूक कोंडी, अपघात, वणवा लावण्यामुळे रस्ते बंद होऊन शेकडो वाहने अडकून पडण्यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी अतिधाडस, फोटो, सेल्फी काढण्यासाठी जीवघेणे धाडस आणि नियंत्रण हरवलेल्या पर्यटकांमुळे सहलीचा आनंदच हरवला आहे.

करोनाचे सगळे निर्बंध उठल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या मोठय़ा गर्दीने गजबजून गेली आहेत. सूर्योदय पाहण्यासाठी येथील विल्सन पॉइंट, सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येथील मुंबई पॉइंटवर पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. दिवसभर विविध पॉइंट्सची सफर पर्यटक करीत आहेत. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीने दोन किलोमीटर अंतरात वाहनांच्या दिवसभर लागला रांगा लागल्याचे दिसत होते. त्याचबरोबर आर्थर सीट,  मुंबई, केटस पॉइंट या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीत पर्यटक मोठय़ा संख्येने अडकलेले दिसत आहेत. सलग सुट्टय़ांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार याची माहिती असूनही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन पोलिसांकडून झाले नसल्याचे पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.

उन्हाळी हंगाम सुरू झाला असला तरी, वाहतुकीचे नियोजन पोलीस विभागाने केले नसल्याचा फटका पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे. वाहतुकीचे नियोजन करण्याऐवजी पोलिसांची फौज नाक्यानाक्यावर वाहन अडवणूक करताना दिसत आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे अशी मागणी शहरातून केली जात आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी लक्ष घालून पर्यटन कालावधीसाठी वाहतूक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र पोलीस तैनात करावे, अशी मागणी स्थानिक व पर्यटकांनी केली आहे.

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटातील दांडेघर गावच्या हद्दीत आणि पसरणी घाटात वणवा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प होणे नित्याचे झाले आहे. वणवा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या वणव्यात अनेक दुर्मीळ वनसंपदा जळून नष्ट झाली तर कित्येक वन्य प्राणी आणि कीटक, पक्षी मृत पावले असण्याची भीती व्यक्त केला जात आहे. ही आग एवढी मोठी होती की रस्त्यावर आगीचे लोट आले होते त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडय़ा काही काळ ठप्प झाल्या होत्या. तर पाचगणी वाईत रस्ते बंद झाल्याने पर्यटकांच्या शेकडो गाडय़ा अडकून पडल्या होत्या. पर्यटक बेफाम भरधाव वेगाने गाडय़ा चालवत असतात. पसरणी घाट आणि पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर भरधाव वेगात गाडय़ा चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. गाडय़ा दरीत कोसळल्या आहेत. या अपघातात गाडय़ांचे नुकसान, दुचाकी स्वार आणि पादचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. शनिवारी पर्यटकांच्या भरधाव वेगातील गाडय़ा समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. यामुळे वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huge crowd of tourists in mahabaleshwar and pachgani zws

ताज्या बातम्या