मानवी दात हे धोकादायक शस्त्र मानले जाऊ शकत नाही, ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. एका महिलेने तिच्या सासरच्यांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला गेला. सदर तक्रारीत मेहुणीने चावा घेतल्याचा आरोप महिलेने केला होता. चावा घेतल्यानंतर दातांच्या खुणांमुळे फक्त साधी दुखापत झाल्याचे तक्रारदार महिलेच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांवरून दिसून आले होते. यानंतर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि संजय देशमुख यांनी सदर निर्णय दिला.

या प्रकरणातील एफआयआरनुसार तक्रारदार महिलेचा तिच्या मेहुणीने चावा घेतला होता. यानंतर आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली धोकादायक शस्त्रांनी नुकसान पोहोचवणे, एखाद्याला दुखापत करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सदर एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मानवी दात हे धोकादायक शस्त्र असल्याचे म्हणता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने सदर एफआयआर रद्द केला.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ नुसार (धोकादायक शस्त्राच्या मदतीने एखाद्याला इजा पोहोचवणे) शस्त्रामुळे केलेली दुखापत ज्यामुळे मृत्यू किंवा गंभीर इजा होऊ शकते. सध्याच्या प्रकरणात तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांवरून असे दिसून येते की दातांच्या खुणांमुळे फक्त साधी दुखापत झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भादंवि कलम ३२४ अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नसताना आरोपीला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असा निर्णय देत उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द केला. तसेच आरोपी आणि तक्रारदार यांच्या मालमत्तेचा वाद असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.