सांगली : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी तहसिल कार्यालयात कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. जिल्ह्यातील सहा नगरपालिका, दोन नगरपंचायतीसाठी शेकडोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले असून उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत रूसवे-फुगवे काढून अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे.
जिल्ह्यात ईश्वरपूर, विटा, पलूस, तासगाव, जत आणि आष्टा या सहा नगरपालिका आणि शिराळा, आटपाडी या दोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. स्थानिक पातळीवरील आघाड्या, महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवारांची अंतिम यादी अद्याप जाहीर न केल्याने इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अखेरच्या मुदतीची संधी साधत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
जतमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. रविंद्र आरळी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत जाउन उमेदवारी दाखल केली. तसेच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून सांगली बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार उपस्थित होते. जतमध्ये महायुतीतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
तासगावमध्ये तिरंगी लढतीचे संकेत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, महायुती आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांची आघाडी असा तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तीन्ही गटाकडून आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तीन वाजेपर्यंत मुदत असताना एकाच वेळी बहुसंख्य कार्यकर्ते तहसिल कार्यालयात आल्याने अखेर प्रवेशदार बंद करून त्यांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू ठेवावे लागले. सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
विटा नगरपालिकेसाठी शिवसेनेच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष व सदस्य पदाच्या २७ जागासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपचा वरचष्मा असलेल्या महायुतीकडूनही थेट लढत देण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नसल्याने थेट लढत कोणामध्ये होणार हे अस्पष्ट आहे. पलूस नगरपालिकेसाठी आज महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी ज्योत्स्ना येसुगडे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे.
नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत सर्वच ठिकाणी अधिकृत उमेदवाराबाबत औत्सुक्य राहणार आहे. नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी आता चार दिवस प्रयत्न केले जाणार असून यामध्ये नेतेमंडळींची कसोटी लागणार आहे.
