मिरजजवळ माणुसकीला काळिमा फासणारी घटना

सांगली : वेगवान प्रवासासाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच, यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. मात्र, या वेगवान वाहनांच्या धडकेत एखादी व्यक्ती प्राणाला मुकली आणि त्याला मदत न मिळता त्याच्या देहावरून शेकडो वाहनांचा प्रवास तसाच होत राहिला तर..! नव्याने आकारास आलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरजेजवळ मध्यरात्री ही माणुसकीला काळिमा फासणारी  घटना घडली. ज्या वेळी हा प्रकार लक्षात आला त्या वेळी मृतदेहाचे अशरश: तुकडे गोळा करण्याची वेळ पोलिसांवर आली.

याबाबत माहिती अशी की, रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील मिरजेजवळील निलजी-बामणी गावच्या हद्दीमध्ये काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने एक अज्ञात व्यक्ती रस्त्यावर पडली. पडलेली व्यक्ती तशीच रस्त्यावर पडून राहिली असताना त्या व्यक्तीच्या देहावरून शेकडो वाहने वेगात तशीच पुढे गेली. यामुळे या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर इतस्तत: विखुरले गेले. ही माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या पार्थिवाचे महामार्गावर विखुरलेले तुकडे गोळा करीत पोत्यात भरले आणि पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडला. या व्यक्तीची ओळखही पटू शकली नाही. यामुळे अज्ञात व्यक्तीचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू एवढी नोंद सरकारी कागदपत्रावर झाली. मृत व्यक्ती बेघर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.