पहिल्या शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येची स्मृती जागविणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून पत्नी व चार मुलाबाळांसह विष घेऊन साहेबराव पाटील करपे या शेतकऱ्याने केलेल्या राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनेला १९ मार्च २०१८ ला ३२ वर्षे पूर्ण होत आहे. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकरी नेते संतोष अरसोड आणि किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी तसेच महागाव पत्रकार संघाने या आंदोलनाचे आवाहन केले आहे. यवतमाळ  जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे राहणारे ८० एकर शेतीचे मालक साहेबराव मामा अशी पंचक्रोशीत ख्याती असलेल्या करपे पाटलांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आपली पत्नी मालतीसह मुलगा भगवान (१३), सारिका (११), मंगला (९), विश्रांती (७) अशा चारही अपत्यांना सेवाग्राम आश्रमात नेऊन तिथे ‘येऊ द्या गुरुमाऊली’हे भजन सायंकाळी म्हटले. रात्री भजी करून त्यात विष घालून सर्व कुटुंबांना खाऊ घातली. भगवान वगळता तिघेजण मृत्युमुखी पडले. भगवानचा गळा  आवळून त्यालाही मारून टाकल्यावर स्वत: विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली. शेतकरी कुटुंबाची राज्यातील ही पहिली आत्महत्या होती. या घटनेने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. त्या घटनेच्या स्मृतिनिमित्त किसानपुत्र, संवेदनशील नागरिक व शेतकरी राज्यभर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. महागाव आणि सेवाग्राम शिवाय राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन होणार असल्याची माहिती गजानन वाघमारे यांनी दिली.

गेल्यावर्षी नेर तालुक्यातील सातेफळ येथे या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांनी घरोघरी पांढऱ्या रांगोळीत काळे ठिपके असलेल्या रांगोळ्या काढून पांढऱ्या कपाळावर वैधव्याची काळी टिकली, असे प्रतीकात्मक आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे, पण सरकारने ती टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप अमर  हबीब, डॉ. चेतन दरणे, प्रा. घनश्याम  दरणे या शेतकरी नेत्यांनी केला आहे. अन्नत्याग आंदोलनात प्रकाश पोहरे, चंद्रकांत वानखेडे, रविकांत तुपकर, वामनराव चटप, आ. बच्चू  कडू, रवि राणा, नवनीत कोैर, कृती देसाई, अनिल हमदापुरे, अ‍ॅड. महिंद्र ठाकरे, विजय शेगोकार आदी  शेतकरी नेते सहभागी होणार  असल्याचे गजानन वाघमारे यांनी कळवले आहे.

त्या पुलाला साहेबराव पाटलांचे नाव द्या 

ज्या चिलगव्हाणचे साहेबराव पाटील करपे रहिवासी होते. त्या चिलगव्हाणजवळील नदीवर पूल आणि परिसरात रस्ते बांधण्यासाठी शासनाकडून भाजप आमदार राजूू नजरधने यांनी शंभर कोटी रुपये यंदा मंजुर करून घेतले आहेत. या पुलाला साहेबराव पाटील करपे यांचे नाव देण्यात यावे, अशी  मागणी शेतकरी नेते संतोष अरसोड यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunger strike in memory of farmer family suicide completing 32 year
First published on: 17-03-2018 at 02:37 IST