कराड : कराड-चिपळूण महामार्गाच्या रुंदीकरण कामाविरोधातील ‘मनसे’चे बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी बेंदराची पुरणपोळी खाऊन मागे घेण्यात आले.
महामार्ग विभागाने लेखी पत्राद्वारे विविध मागण्यांसंदर्भातील स्पष्टीकरण देत मागण्या वेळेत पूर्ण करत असल्याचे आश्वासन दिल्याने तहसीलदार अनंत गुरव, महामार्गाचे उपअभियंता महेश पाटील, ‘भाजप’चे विक्रम पाटणकर यांच्या हस्ते सरबत पिऊन व बेंदूर असल्याने पुरणपोळी खाऊन ‘मनसे’चे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संजय सत्रे, राहुल संकपाळ, चंद्रकांत बामणे, राम माने, हणमंत पवार आदी पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांनंतर उपोषण मागे घेतले.
उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, सुरेश पाटील, महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता आर. एस. मणेर, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, मनसैनिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गुहागर-विजापूर महामार्गावरील कराड-पाटण दरम्यान, काही ठिकाणचे निकृष्ट काम, ठेकेदार कंपनीची झालेली दंडवसुली, तसेच काही दिवसांपूर्वी पाटण ते संगमनगर वाहतूक बंद ठेवल्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी ‘मनसे’ने हे बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांच्या या मागण्यांवर महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांनी लेखी पत्राद्वारे खुलासा केल्याने उपोषण स्थगित केले गेले.